कोरोना बाधितांच्या उपचारासाठी ‘रेमडिसीवीर’ इंजेक्शनची खरेदी; पाच हजार कुपींसाठी ३३ लाखाचा खर्च

रूग्णांवरील या उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी करण्याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी २७ मार्च २०२१ रोजी आणि वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी २२ मार्च २०२१ रोजी पत्राद्वारे इंजेक्शनच्या पाच हजार कुपींची मागणी केली आहे.

    पिंपरी: कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी रेमडिसीवीर(remedicivir) इंजेक्शनची आवश्यकता निर्माण झाली आहे. या इंजेक्शनच्या पाच हजार कुपी तातडीने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३ लाख ३२ हजार रूपये इतका खर्च होणार आहे.

    कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. महापालिकेची विविध रूग्णालये तसेच कोरोना रूग्णांलयांमध्ये कोरोना बाधीत रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तातडीने रेमडिसीवीर १०० एमजी या इंजेक्शनची आवश्यकता आहे. रूग्णांवरील या उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी करण्याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी २७ मार्च २०२१ रोजी आणि वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी २२ मार्च २०२१ रोजी पत्राद्वारे इंजेक्शनच्या पाच हजार कुपींची मागणी केली आहे.

    यापूर्वी रेमडिसीवीर १०० एमजी या इंजेक्शनच्या दोन हजार कुपी खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुर्नप्रत्ययी आदेशान्वये इंजेक्शनच्या एक हजार कुपी तातडीने खरेदी करण्यात आल्या आहेत. या कालावधीत वैद्यकीय विभागाकडून ७०५० कुपींची मागणी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने दरपत्रके मागविण्यात आली. त्यामध्ये नाशिक येथील गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांनी ५९५ अधिक जीएसटी असा ६६६ रूपये ४० पैसे हा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, इंजेक्श्नच्या तातडीक मागणीच्या अनुषंगाने गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून इंजेक्शनच्या पाच हजार कुपी तातडीने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३ लाख ३२ हजार रूपये इतका खर्च होणार आहे. हा खर्च ‘कोरोना निधी’ या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.