राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

तक्रारदार या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. भाजी घेण्याच्या निमित्ताने समीर हा तक्रारदार यांच्या घरी ये- जा करत असे. दीड वर्षापूर्वी दुपारच्या सुमारास तक्रारदार घरात एकटा होत्या. त्यावेळी समीर याने त्यांच्या किचनमध्ये जात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता त्याने मुलांना व पतीला ठार मारण्याची धमकी दिली.

    पुणे : बलात्कार केल्याच्या आरोपावरून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढव्यात हा प्रकार घडला असून, महिलेला पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पिडीत महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, समीर बंडू तात्या गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. भाजी घेण्याच्या निमित्ताने समीर हा तक्रारदार यांच्या घरी ये- जा करत असे. दीड वर्षापूर्वी दुपारच्या सुमारास तक्रारदार घरात एकटा होत्या. त्यावेळी समीर याने त्यांच्या किचनमध्ये जात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता त्याने मुलांना व पतीला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्यावर बलात्कार केला. दरम्यान पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याने पिडीत महिलेने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. दरम्यान १७ डिसेंबर २०१९ रोजी दुपारच्या सुमारास पुन्हा जबरदस्तीने शरीर संबंध करत होता. त्यावेळी पिडीत महिलेच्या पती आणि मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्यांना ठार मारण्याची धमकी देत तेथून निघून गेला. या सर्व प्रकारानंतर मुंढवा पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

    तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील उर्फ बंडू गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितली असा आरोपी करत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन आपल्याला तीन लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.