शिंगवेत आढळली दुर्मिळ ‘लेपर्ड गेको’ पाल; आंबेगाव तालुक्यात दर्शन

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील सर्प व किटक आभ्यासक गायत्री अवधानी व शारदा राजगुरव हे शिंगवे परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करत असताना त्यांना माळरानावर 'लेपर्ड गेको' ह्या दुर्मिळ पालीचे अस्तित्व आढळून आले.

    पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील सर्प व किटक आभ्यासक गायत्री अवधानी व शारदा राजगुरव हे शिंगवे परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करत असताना त्यांना माळरानावर ‘लेपर्ड गेको’ ह्या दुर्मिळ पालीचे अस्तित्व आढळून आले.

    लेपर्ड गेको ही खडकाळ माळरानावर आढळणारी पालीची ‘निशाचर’ प्रजाती असून ही फक्त रात्रीच्या वेळीच ढगाळ वातावरण व पहिल्या पावसात माळरानावर खडकांवर, दगडांवर आढळते. ह्या पालीचे शास्रीय नाव ‘युब्लिफँरिस मँक्युलारिस’ आहे.

    अंगावरील बिबट्यासारख्या नक्षीमुळे तिला ‘लेपर्ड गेको’ असे म्हटले जाते. शेतीला ऊपद्रवी लहान किटक, नाकतोडे, पतंग हे ह्या पालीचे भक्ष्य असून या ऊपद्रवी किटकांच्या नियंत्रणाचे काम ह्या पालीकडून होते असे किटक अभ्यासक गायत्री अवधानी यांनी सांगितले.

    बिबट्यासारखे ठिपक्यांची नक्षी

    ‘लेपर्ड गेको’ मादी नरापेक्षा आकाराने लहान असून नराची लांबी २० ते २८ से. मी.असून मादी १८ ते २० सें.मी.लांबीची असते. या पालीच्या पिल्लांच्या अंगावर गडद पिवळे व काळे आडवे पट्टे दिसतात व पालीच्या वाढीबरोबर अंगावरील पट्टे फिकट होऊन बिबट्यासारखे ठिपक्यांची नक्षी पालीच्या अंगावर दिसून येते.

    ‘लेपर्ड गेको’चा जैव विविधता यादीत सामावेश करा

    तालुक्यात प्रथमच या पालीचे अस्तित्व आढळून आले. या पालीची माहिती आंबेगावच्या वन अधिकारी राजहंस यांना देऊन आंबेगाव तालुक्यातील जैव विविधता यादीत या पालीचा सामावेश करावा, अशी मागणी अवधानी यांनी केली.