पुणे शहर गावठाणातील जुन्या वाड्यांचा होणार पुनर्विकास

  पुणे : शहरातील गावठाणातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करताना वाड्याची खोली किंवा इमारतीची खोली किती लांब आहे हे न पाहता सरसकट सर्वांना साईड मार्जिन आणि रिअर मार्जिनमध्ये सूट द्यावी, अशी मागणी ‘आपलं पुणे’ या संस्थेने केली आहे. ही सवलत देताना प्रशासनाने हार्डशिपसाठी ठरविलेला 10 टक्के आणि कमर्शिअलला 15 टक्के दराने शुल्क घ्यावे, असेही संस्थेने म्हटले आहे.

  साईड मार्जिन व रियर मार्जिनची जागा सोडण्याचे बंधन

  याबाबत संस्थेचे उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. डिसेंबर २०२० मध्ये राज्य सरकारने युडीसीपीआर (सर्वंकष विकास नियंत्रण नियमावली) लागू केली हाेती. यामध्ये गावठाण भागात कोणतेही बांधकाम करताना फक्त सात मीटर रुंदी असेल, अशा ठिकाणी साईड मार्जिन व रियर मार्जिनची जागा सोडण्याचे बंधन नव्हते पण बाकी सर्वत्र फ्रंट मार्जिनबरोबर साईड मार्जिन रिअर मार्जिन एक एक मीटर सोडावे अशा पद्धतीची तरतुद केली हाेती.

  महापालिका आयुक्तांकडून मागविला अहवाल

  या तरतुदीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या गेल्या हाेत्या. दिवगंत आमदार मुक्ता टिळक यांनी पाठपुरावा केला हाेता. त्यानंतर रिअल मार्जिन आणि साईड मार्जिन रद्द करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली हाेती. त्यानुसार राज्य सरकारने महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागिवला हाेता. सप्टेंबर २०२१ मध्ये महापालिकेने नगर विकास विभागाकडे अहवाल पाठविला हाेता.

   

  याबाबत नुकतेच निर्णय झाला असुन, युडीसीपीआरमधील तरतुदीनुसार साईड आणि रिअल मार्जिनमध्ये सवलत देण्याचे अधिकार असल्याचे नमूद करीत राज्य सरकारने त्यांना निर्णय घेण्यास सांगितले हाेते. आयुक्तांनी नुकतेच एक परिपत्रक काढून 18 मीटर खोली ज्या वाड्याची आहे . त्या वाड्यांमध्ये फक्त हार्डशिप भरून समासिक अंतरात आयुक्तांना असलेल्या अधिकारात सवलत दिली. पण  या आदेशाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे जुन्या वाड्यांचा पुर्नविकास करण्यासाठी सरसकट सवलत द्यावी अशी मागणी आपलं पुणे या संस्थेने केली आहे.