शिक्रापूरच्या पाटवस्तीतील कचरा गाडी नियमित करा; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसची ग्रामपंचायतकडे मागणी

शिक्रापूर ता. शिरुर येथील कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना गावातील अनेक सोसायट्यांमध्ये कचरा गाडी चार-चार दिवस येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

    शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर येथील कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना गावातील अनेक सोसायट्यांमध्ये कचरा गाडी चार-चार दिवस येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्रापूर येथील पाटवस्ती भागातील सोसायट्यांमध्ये कचरा गाडी नियमित सुरु करा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसचे अध्यक्ष डॉ. नितीन सोनवणे यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतकडे केली आहे.

    शिक्रापूर येथील कचरा समस्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेली असताना अद्याप कचरा समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. मात्र, गावामध्ये गोळा होणारा सर्व कचरा ग्रामपंचायतच्या कचरा गाडीच्या माध्यमातून एका जागेवर संकलित केला जात आहे. परंतु, पाट वस्ती भागामध्ये तीन ते चार दिवस कचरा गाडी येत नसल्याने नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला जात असल्याने डासांचा मोठा उपद्रव वाढला आहे.

    परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या भागात दररोज कचरा गाडी सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसचे अध्यक्ष डॉ. नितीन सोनवणे यांनी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्याकडे निवेदन देत दररोज कचरा गाडी सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत, जितेंद्र काळोखे, बापू गायकवाड, सिकंदर शेख, कमलेश वाघोले यांसह आदी उपस्थित होते.

    लवकरच कचरा गाड्या नियमित होतील : रमेश गडदे, सरपंच

    शिक्रापूरमध्ये सध्या गणेशोत्सवाच्या कामामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी तसेच काही वाहने व्यस्त असल्याने कचरा वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, लवकरच शिक्रापूरमधील प्रत्येक सोसायटीमध्ये कचरा गाड्या दररोज पाठविल्या जातील, असे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.