मंत्र्यांच्या सोयीसाठी धावपट्टीचा खेळखंडोबा

अॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्री महोदयांना लिफ्टने जाण्याचाही त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती. स्टेडियमचा वापर खेळाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करण्यात येणार नाही

    पुणेः क्रीडामंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी क्रीडा विभागातील अधिकारी प्रसंगी कोट्यवधी रुपयांच्या सुविधांचा कसा बळी देऊ शकतात याचे उदाहरण शनिवारी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत बघायला मिळाले. मंत्री व इतर मान्यवरांना लिफ्टने दोन मजले चढावे लागू नयेत,म्हणून त्यांची वाहने थेट अॅथलेटिक्सच्या कृत्रिम धावपट्टीवर आणण्याची कामगिरी करून या सरकारी बाबूंनी नवीन ‘विक्रम’ घडविला.

    म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. स्टेडियमच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये स्पर्धेवेळी वापरण्यासाठी दालने आहेत. त्यावत या पूर्वीच क्रीडा संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी डल्ला मारून तेथे आलिशान कार्यालये थाटली आहेत. क्रीडा विद्यापीठाच्या तयारीसाठी या इमारतीमध्ये शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
    तिला ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवारांपासून क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त उपस्थित होते. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत.

    स्टेडियमची रचना अशी आहे की अॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्री महोदयांना लिफ्टने जाण्याचाही त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती. स्टेडियमचा वापर खेळाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करण्यात येणार नाही, अशा घोषणा करणाऱ्या क्रीडामंत्र्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावर त्यांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केले.