rupali chakankar

आता पाण्याची वेळ (Water Supply Timing) बदला, अशी मागणी न करता नगरसेवक बदला म्हणण्याची वेळ आली आहे, असे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar In Pimpri) यांनी म्हटले आहे.

    पिंपरी : शरद पवार यांच्या महिला धोरणामुळेच मी आज महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान आहे. त्यामुळे शरद पवार यांना वाढदिवसाची भेट द्यायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान (Vote For Rashtrawadi Congress Party) करून महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आवाहन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले. पिंपळे गुरवमध्ये पहाटे चार वाजता पाणी येते, त्यासाठी महिलांना पहाटे चार वाजता पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे आता पाण्याची वेळ बदला, अशी मागणी न करता नगरसेवक बदला म्हणण्याची वेळ आली आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे, आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णु एकनाथ शेळके, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड यांच्यावतीने आयोजित महिला स्नेहमेळावा, रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे, माजी आमदार विलास लांडे, मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहाराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर शकुंतला धराडे आदी उपस्थित होते.

    रुपाली चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, पेट्रोल, गॅस सिलेंडर भाववाढ, तसेच खाद्यतेल, डाळींच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चं दाखवलेले स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. मोदींच्या भूलथापांना सर्वजण भुलले आणि त्यांना निवडून दिले. त्यांना निवडून देण्यात सर्वाधिक हात हा महिला वर्गाचा आहे, हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे या महिलाच आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणून भाजपला धडा शिकवतील. उज्ज्वला गॅस योजनेचा पैसा बॅनर रूपाने गावागावात पोहोचला. या जाहिरातीचा खर्च ३७५५ कोटी रुपये इतका झाला. परवा पाण्यात डुबकी मारायचा खर्च २४ कोटी रुपये झाला, अशा शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

    चाकणकर यांनी सांगितले, भयमुक्त शहर, भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा देत भाजपने शहराची सत्ता मिळवली. मात्र, शहर ना भयमुक्त झाले ना भ्रष्टाचारमुक्त. उलट शहर बकाल केले. शहर व उपनगरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांना चाप बसविणारे शक्ती विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात नक्की मंजूर होईल, यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. महिलांची ताकद सर्वात मोठी असून, उद्याचा दिवस आपलाच हा धीर महिलांमध्ये असतो. संकटे क्षणभंगुर असतात. त्यांना सामोरे जाण्याची ताकद महिलांमध्ये असते. आयुष्यात संकटे ही ईसीजी प्रमाणे असतात. त्यामुळे संकटांना न घाबरता त्यांचा धीराने सामना करा, असे आवाहन त्यांनी महिलांना केले.

    पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणी देणे ही अजित पवार यांची योजना होती. तसे नियोजनही त्यांनी केले होते. मात्र, आता भाजप आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे. त्यामुळे महिला वर्गाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन विकासकामे करण्याची संधी द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड हे आपल्या स्वप्नातील शहर साकारले. त्याचे सुशोभीकरण केले. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजपने शहराला बकाल अवस्थेत नेऊन ठेवले. आपल्या महापौर नेमक्या काय बोलतात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. बेताल वक्तव्य करणाऱ्या महापौरांचा आपण निषेध करतो. बेताल वक्तव्य करायची ही भाजपची संस्कृतीच आहे, असेही त्या म्हणाल्या.

    शिवरायांनी महिलांना मान सन्मान मिळवून दिला, तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शैक्षणिक प्रवाहात आणून समाजात मानाने जगायला शिकवले. छत्रपती शिवरायांचा अपमान आपल्या सर्वांचा अपमान आहे त्यामुळे त्यांचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही. केंद्रातल्या विषारी झाडांची पाळेमुळे छाटून काढण्यासाठी, तसेच स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

    रुपाली ठोंबरे म्हणाल्या, की नुकताच आपण मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.अजित पवार यांनी विश्वास दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची कार्यकर्ती म्हणून काम करण्यास आपण तयार आहोत. ज्यांच्यासोबत १४ वर्ष काम केले, त्या भावांना आपले सांगणे आहे, की या बहिणीला आपण ओळखू शकला नाहीत, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की राष्ट्रवादीचे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. महिलांच्या स्वाभिमानाचा विषय जपला पाहिजे. सोशल मीडियावर कमरेखालील विनोद करणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे, यासाठी रूपालीताई चाकणकर आपण महिला आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करा. राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. महिला सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी तिला पुरुषांनी पाठिंबा दर्शवला पाहिजे. आम्ही महिला घर सांभाळून तारेवरची कसरत करतो. महिलांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पिंपरी-चिंचवडचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, याचे सर्व श्रेय अजित पवार यांना जाते. राजेंद्र जगताप यांनी केलेल्या कामांची यादी बघितली, तर त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात केलेली कामे ही आमदार लेव्हलची कामे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विकासकामे केली आहेत. भाजपने रोजगार देण्याऐवजी २०१४ नंतर दहा कोटी रोजगार काढून घेतले. महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे. मतदान कोणाला आणि कशासाठी करतोय हे आपल्याला समजायला हवे, असेही त्या म्हणाल्या.