भाजपच्या हवेली तालुकाध्यक्षपदी संदीप भोंडवे

  कोरेगाव भीमा : पेरणे (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे (Sandip Bhondwe) यांची भारतीय जनता पार्टीच्या हवेली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

  संदीप भोंडवे कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून, नामवंत मल्ल घडवणे, त्यांना दत्तक घेणे आदींसाठी त्यांनी स्वतः कष्ट घेतल्यामुळे कुस्ती क्षेत्रात त्यांच्या कार्याचा मोठा ठसा उमटला आहे.

  पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासोबत विविध सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत. संदीप भोंडवे यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी असून, तळागाळापर्यंत त्यांचा जनसंपर्क आहे. त्याचा मोठा फायदा भाजपाला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

  यावेळी आमदार महेश लांडगे, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, रोहिदास उंद्रे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, माजी तालुकाध्यक्ष सुनील कांचन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, गणेश कुटे, पंचायत समितीचे सदस्य शाम गावडे, तालुका उपाध्यक्ष अनिल सातव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले, राजेंद्र वाघमारे, रवींद्र वाळके, दशरथ वाळके, रवींद्र कंद, राहुल काळभोर आदी उपस्थित होते.

  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यावर विशेष भर देण्यात येईल. हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी मेहनत घेतली जाणार आहे. गाव आणि वाड्यावस्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांचे जाळे उभारून युवकांचे संघटन करणार आहे.

  – संदीप  भोंडवे, नूतन तालुकाध्यक्ष, भाजप हवेली.