पिंपरी चिंचवडच्या सार्थक मटालेची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी ; मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडापरिषदेच्या सुवर्णलक्ष्य पुरस्काराने सन्मानित

पिंपरी : मनात इच्छाशक्ती व त्याला प्रयत्नांची साथ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हे आपल्याला सार्थक विठ्ठल मटाले या कुमारवयीन खेळाडूने सिद्ध करून दाखविले आहे. त्याला नुकताच कोल्हापूर येथे दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडापरिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराने सार्थकला सन्मानित करण्यात आले आहे

पिंपरी : मनात इच्छाशक्ती व त्याला प्रयत्नांची साथ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हे आपल्याला सार्थक विठ्ठल मटाले या कुमारवयीन खेळाडूने सिद्ध करून दाखविले आहे. त्याला नुकताच कोल्हापूर येथे दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडापरिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराने सार्थकला सन्मानित करण्यात आले आहे. रोल बाँल,रोलर व्हाँकी व आईस हाँकी या स्केटींगच्या वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत आपल्या खास नैपुण्यपुर्ण खेळाने मैदान गाजवणाऱ्या सार्थकचा हा प्रवास खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या उदयोन्मुख खेळाडुंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

भोसरी (सद्गुरूनगर) येथे राहणारा सार्थक हा मुऴचा जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावच्या शेतकरी कुटुंबातील कै.बबन बहिरू मटाले यांचा नातू.वडील विठ्ठल व चुलते आण्णासाहेब हे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने भोसरी येथे आले.सार्थक हा आई वडीलांचा एकुलता एक मुलगा.वडील टाटा मोटर्समध्ये नोकरी करतात तर आई ग्रहिणी असून सार्थक टाटा मोटर्सच्याच विदया निकेतन शाळेत शिकतो आहे.पहिल्या इयत्तेत असल्यापासूनच त्याला खेळाची आवड होती. बालवयातच या आवडीने शाळेच्या ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या स्केटींग या खेळाकडे त्याचे लक्ष वेधले आणि तो खेळ आपल्यासाठीच आहे अशी सार्थकची मनोमन भावना बनली.

पुढे त्याच्यातील या दुर्दम्य इच्छेला प्रत्यक्ष स्वप्नात उतरविण्यास पहिल्यांदा शाळेतील क्रिडाशिक्षक शैलेंद्र पोतनीस हे दुवा बनले.त्यांनी सार्थकला स्केटींगचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.आणि हीच संधी हेरत सार्थकने त्याचे सोने केले.खेळण्यासाठी लागणारी प्राथमिक साधने घेत बघता बघता मजल दरमजल करत सार्थकने हे उत्तुंग यश कधी मिळविले हे कळले देखील नाही. सार्थकने सुरूवातीला २०१७ मध्ये शालेय संघातून आंतरशालेय स्पर्धेत खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलेच नाही.नंतर जिल्हा पातळीवर मुंबई, पुणे, नंदुरबार, नांदेड याठिकाणी खेळल्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या राज्यपातळीवर व जानेवारी २०२० मध्ये लेह लडाख या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आईस हाँकी या क्रिडाप्रकारात उणे ३५ अंश सेल्सिअस तापमानात तो महाराष्ट्राच्या संघासाठी खेळला.

सार्थक ने आतापर्यंत १२ सुवर्णपदके,४ रौप्य व २ कांस्यपदके तसेच विवीध प्रकारची ११ चषके मिळवली असून बेळगाव येथे झालेल्या सांघिक रोल बाँल स्पर्धेत सलग २४ तास खेळून गिनिज बुक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड केले.तसेच इंडिया बुक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड मध्येही त्याची नोंद झाली आहे. २०१८ मध्ये रिव्हर्स स्केटींग लार्जेस्ट मँरेथाँन मध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले. यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये सार्थकला जुन्नर तालुका मित्र मंडळ,पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजन्मभूमी क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सर्वाच्या अवलोकनार्थ त्याला नुकताच कोल्हापूर येथे दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडापरिषदेच्यावतीने दिला जाणारा मानाचा सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराने सार्थकला सन्मानित करण्यात आले आहे. सार्थकचे या कामगिरीमागे मुख्यत्वे त्याचे खेळाचे गुरू शैलेंद्र पोतनीस, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक त्याची आई अलका, वडील विठ्ठल, चुलते आण्णासाहेब व सहकारी मित्र यांची साथही मोलाची ठरली.त्याने आता रोलर हाँकी खेळासाठी भारतीय संघातून खेळून जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचविण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.