तरुणीवरून युवकांमध्ये कोयत्याने मारहाण ; एकजण गंभीर जखमी

स्वप्नालीचा नाद सोडून दे. ती आकाशची आहे, असे म्हणून कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादी यांना पाठीवर आणि कपाळावर मारले. त्यानंतर विजय वारे याने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या पोटावर, छातीवर मारहाण केली.

    पिंपरी: स्वप्नालीचा नाद सोडून दे, ती आकाशची आहे, असे म्हणत सहा मित्रांनी मिळून एका तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना बोल्हाईचा मळा, जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. या घटनेत दत्तप्रल्हाद सोनवणे (वय २०, रा. कुदळवाडी, चिखली)हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

    याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित फांदे, रोहित वावरे, आकाश भुतावळे, प्रथमेश तुरुकमारे (चौघे रा. भाटनगर, पिंपरी), विजय वारे, सार्थक साळवे (रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी रोहित वावरे आणि आकाश भुतावळे दुचाकीवरून फिर्यादी सोनवणे यांच्याकडे आले. त्यानंतर आरोपी आकाश म्हणाला की, मिटवायचंय, तू गाडीवर बस, असे बोलून फिर्यादी यांना बोल्हाईचा मळा येथे नेले.

    तिथे आरोपी रोहित फांदे होता. त्याने स्वप्नालीचा नाद सोडून दे. ती आकाशची आहे, असे म्हणून कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादी यांना पाठीवर आणि कपाळावर मारले. त्यानंतर विजय वारे याने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या पोटावर, छातीवर मारहाण केली. सार्थक साळवे, प्रथमेश तुरुकमारे यांनी शिवीगाळ करत हाताने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.