१३ वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरक्षारक्षकाला वाकड पोलिसांकडून अटक

    पिंपरी : व्यापारी संकुलासमोर उभ्या असलेल्या वाहनांची एका सुरक्षा रक्षकाने तोडफोड केली. या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने जवळपास १३ टेम्पोचालकांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सुरक्षारक्षक किरण घाडगे याला वाकड पोलिसांनी अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे नवीन कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. त्याच्या समोरच तेथील काही टेम्पोचालक वारंवार बजावून देखील वाहने उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करायचे, असे आरोपी सुरक्षारक्षक किरण घाडगे याचे म्हणणे आहे. याचाच राग मनात धरून मध्यरात्री आरोपी सुरक्षारक्षक घाडगे याने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या टेम्पाचे दगडाने फोडून नुकसान केले. यात १३ रिक्षांच्या काचा फोडल्या असून वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

    तसेच कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा उभ्या केल्या असल्याने आपण स्वत: रिक्षा फोडल्याची कबुली देखील त्याने पोलिसांना दिली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.