काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे (Sharad Ranpise) (वय ७१) यांचे निधन झाले. पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली.

    पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे (Sharad Ranpise) (वय ७१) यांचे निधन झाले. पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता काेराेगांव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काॅंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याचे आणि पक्षाचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

    रणपिसे यांचा पुण्यात जन्म झाला. ते १९७९ साली ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ पर्यंत पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार झाले व तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. सध्या ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते होते. अतीशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत त्यांनी विविध पदावर तीन दशके काम केले. आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली.

    पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘शरद रणपिसे यांनी यांची राजकीय कारकिर्द येरवडा भागातून सुरू केली. पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून चांगले काम केले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य आणि गटनेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केले.

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनेक अध्यक्षांबरोबर त्यांनी काम केले. पक्ष संघटनेचा त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना पक्ष संघटनेतील अनेक कार्यक्रमांमध्ये महत्वाची जबाबदारी दिली जात असे. त्यांच्या निधनामुळे शहर काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मोठे नुकसान झाले आहे आणि पक्षाने एक निष्ठावंत नेता गमवला आहे. मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो.

    दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रणपिसे यांना शोकभावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी म्हणाले की, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शरद रणपिसे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. कायदा व संविधानाचे गाढे अभ्यासक असलेले शरदजी सामाजिक कार्य व समाज प्रबोधनातही नेहमीच अग्रेसर होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ॐ शांती.