काँग्रेसने उभा केलेला देश भाजपने विकायला काढलाय; अजित अभ्यंकर यांची टीका

तसेच नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात. तेच त्यांचे प्रवक्तेही खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे हे काँग्रेसनेच उभे केलं आहे.

  पिंपरी / पुणे : देशामध्ये पाचशेहून जास्त कामगार संघटना आहेत. तसेच अनेक शेतकरी संघटना आहेत. यापैकी एकाही संघटनेची मागणी नसताना केंद्रातील भाजपच्या सरकारने (BJP Government) शेतकरी विरोधी आणि कामगारांविरोधी काळे कायदे कोणत्याही विरोधीपक्षांशी अथवा संघटनांशी चर्चा न करता विधेयकाव्दारे पारित केले. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर शेकडो कामगार संघटनांनी लढून काही संविधानात्मक अधिकार मिळविले होते. ते हक्क या मोदी-शहा यांच्या सरकारने एका रात्रीत रद्द केले, अशी टीका कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम (Dr. Kailas Kadam) यांनी केली. तसेच काँग्रेसने (Congress) उभा केलेला देश भाजपने विकायला काढलाय, अशा शब्दांत ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर (Ajit Abhyankar) यांनी भाजपवर निशाणा साधला.

  सोमवारी (दि.27) संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाविकास आघाडी यांच्या वतीने भारत बंद जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कदम व अभ्यंकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ कामगार नेत्या लता भिसे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांच्यासह अनेक संघटनांनी सहभाग घेतला होता.

  यावेळी अजित अभ्यंकर म्हणाले की, एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी-शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादित होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे. भाजपचे प्रवक्ते देखील बौध्दिक मवाली लोकं सोशल मीडियात वाटेल ते खोटं बोलतात. वृत्तवाहिनींच्या चर्चांमध्ये देखील धडधडीत खोटं बोलतात. यांचे हे बदमाशीचे खेळ आता नागरिकांच्या लक्षात आले आहेत.

  आयता मिळालेला देश भाजपने विकायला काढलाय

  तसेच नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात. तेच त्यांचे प्रवक्तेही खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे हे काँग्रेसनेच उभे केलं आहे. आयता मिळालेला देश भाजपने विकायला काढला आहे. हे सरकार गोरगरीबांचे, शेतकरी-कामगारांचे नसून भांडवलदारांचे आहे, अशी टीका अभ्यंकर यांनी केली.

  पीसीएमसीपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत भाजपची भ्रष्टाचाराबाबत ख्याती

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत भाजपची भ्रष्टाचाराबाबत ख्याती आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी भ्रष्टाचाराचे नवीन कुरण तयार केले आहे. प्रचंड भ्रष्टाचार या मनपात आहे. या विरुध्द पुढील काळात एकजुटीने मोठा लढा उभारु’.