शरद पवारांचे “ते”दौरे ठरले यशस्वी ; पुणे पदवीधरची जागा ताब्यात घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड ४९ हजार मतांनी विजयी झाल्याने भारतिय जनता पक्षाच्या ताब्यातील हा महत्वाचा मतदार संघ आपल्या वर्चस्वाखाली आणण्यात राष्ट्रवादीला मोठे यश आले आहे.

अमोल तोरणे,बारामती : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड ४९ हजार मतांनी विजयी झाल्याने भारतिय जनता पक्षाच्या ताब्यातील हा महत्वाचा मतदार संघ आपल्या वर्चस्वाखाली आणण्यात राष्ट्रवादीला मोठे यश आले आहे. राष्ट्रवादी साठी विशेषतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने कोरोना च्या काळात पवार यांनी या मतदार संघात दौरे करुन केलेली व्युहरचना यशस्वी ठरली आहे.

पुणे पदवीधर मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे यापुर्वीचे प्रयत्न असफल ठरले होते. या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आ. चंद्रकांत पाटील यांच्या कडे भाजपने पक्षसंघटनेची महत्वाची जबाबदारी दिली होती. विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महत्वाची सुत्रे भाजपने सोपविली होती. खासदार सुप्रिया सुळे यांना शह देण्याची मोठी व्यूहरचना भाजपने आखली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ चंद्रकांत पाटील यांनी खा. सुळे यांना घेरण्यासाठी दौंडचे आमदार अॅड राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन मोठी ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीध्ये तळ ठोकल्याने खा सुळे यांच्या पुढे आव्हान निर्माण झाले होते. मात्र भाजपची ही खेळी या निवडणुकीत सपशेल फेल ठरुन खा. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देऊन जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांना आव्हान आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुकीत आ. पाटील विजयी झाले, पुणे पदवीधरची जागा रिक्त झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदार संघात चाचपणी सुरू केली. या मतदारसंघात येणाऱ्या पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या मतदार संघातील राष्ट्रवादी सह शिवसेना व काँग्रेस या पक्षाचे आमदार तसेच खासदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवला. कोरोना च्या काळात शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरे करून हा मतदार संघ आपल्या कडे खेचण्यासाठी रणनिती आखली. या रणनिती नुसार, याअगोदर या मतदारसंघात उमेदवारी दिलेले सारंग पाटील यांच्या ऐवजी दुसर्‍या उमेदवारीची चाचपणी केली, त्यानुसार अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान भाजपने संग्राम देशमुख यांना त्यांचे या मतदारसंघात असणा-या नातेसंबंधांचा विचार करून उमेदवारी दिली होती. मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र चुरशीची लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच झाली. या निवडणुकीत भाजपने सर्व ताकद पणाला लावली, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ .चंद्रकांत दादांनी या मतदार संघातील महत्वाच्या नेत्यांच्या वैयक्तिक भेटी गाठी घेऊन हा मतदार संघ राष्ट्रवादी च्या ताब्यात न जाण्यासाठी व्यूहरचना आखली. राष्ट्रवादीसाठी विशेषतः शरद पवार यांच्या साठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने राष्ट्रवादी ने शिवसेना व काँग्रेस च्या साथीने मोठी रणनिती आखली. स्वतः शरद पवार या मतदार संघात विशेष लक्ष ठेवून होते. अखेर भाजपच्या ताब्यात असणारा पुणे पदवीधर मतदार संघ अरुण लाड यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ने ताब्यात घेऊन भाजपला मोठा धक्का दिला आहे.शरद पवार यांची यांची “पावरबाज “खेळी या मतदार संघात यशस्वी झाली आहे.