जैदवाडीच्या सर्वांगीण विकासाला देऊ प्राधान्य : सरपंच शितल जैद

  राजगुरूनगर : खेड तालुक्यातील उत्तरेला डोंगराच्या कुशीत वसलेलं अगदी छोटसं गाव म्हणजे जैदवाडी! तालुका मुख्यालयापासून जवळ असलेले व साधारण अकराशे ते बाराशे लोकसंख्या जैदवाडीची आहे. सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत २०१५ मध्ये माझ्या रूपाने महिलेला प्रथमच सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उच्चशिक्षित सरपंचांना सुशिक्षित सदस्यांनीही साथ दिली. जनतेला सोबत घेऊन एकीने कामाला सुरुवात झाली. गावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचा मनाेदय सरपंच शितल जैद यांनी व्यक्त केला.

  विकासकामांचा अनुशेष भरून काढला

  ग्रामपंचायत डिजिटल करून सर्व प्रकारचे दाखले संगणकावरून दिले जातात. गावात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा निवऱ्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरवात केली. पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत सुमारे ४० घरकुले बांधून लोकांना सुपूर्द केली. त्यासोबत कॉंक्रीट रस्ते, लाईट, पाणी देखील उपलब्ध करून दिले. पहिल्या पंचवार्षिक सत्रात मागील विकासकामांचा अनुशेष भरून काढला. त्यामध्ये पानंद रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय रस्ता, शिवकालीन विहीर, डांबरी रस्ते अशी कामे करण्यात अाली, असे सरपंच जैद यांनी सांगितले.

  नागरिकांच्या सहकार्याने गाव काेेराेनामुक्त

  काेरोना महामारीत देखील विशेष काळजी घेतली. नागरिकांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवले. आदिवासी लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना लसीकरणास उद्युक्त केले. सुसज्ज अंगणवाडी इमारत बांधली. गावात ठिकठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले आहेत. गावात दोन वस्तीवरील अंतर लक्षात घेता दोन स्मशानभूमी नव्याने उभारण्यात आल्या. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. आमच्या गावातून पुणे नाशिक रेल्वे लोहमार्ग जात आहे. या भूसंपादन प्रक्रियेत प्रकल्पबाधित व रेल्वे महामंडळ यांच्यात समन्वयाची भूमिका ठेवून प्रशासनास सहकार्य राहील. नागरी सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे सरंपच जैद यांनी नमुद केले.

  वीजबचतीसाठी बसविणार सोलर प्लांट

  संपूर्ण गावात दारूबंदी, मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान, वीजबचतीसाठी सोलर प्लांट बसविणार आहे. लोकांना बायोगॅससाठी प्रोत्साहित करणार आहे. तरुण व महिला वर्गाला रोजगारसंधी उपलब्ध व्हावी म्हणून विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. मंगल कार्यालय व व्यापारी संकुल बांधून ग्रामपंचायत उत्पनाचे स्रोत कायमस्वरूपी वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सरपंच जैद यांनी सांगितले.

  सरपंच म्हणून पदभार मिळाल्या पासूनच अवघड प्रश्न सोडविण्याचा व जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा मानस उरी बाळगला. लक्षावधी रुपयांची कामे करण्यात यशस्वी ठरले. त्याचबरोबर नागरिकांचे वैयक्तिक वाद-विवाद सोडवण्याचा मनस्वी प्रयत्न करून अनेक वाद मिटवले. त्यामुळेच या कामांच्या जोरावर जनतेने सलग दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवडून दिले.

  – शितल जैद, सरपंच

  (शब्दांकन : अमित टाकळकर)