धक्कदायक! गाडीला पुढे जाण्यास जागा न दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण ; कारचालक फरार

गाडीतून उतरत "मला साईड का नाही दिली" असे म्हणून एसटीची पुढील काच फोडली. तसेच चालकाच्या हातास मारहाण केली. त्यावेळी वाहक सारिका नामदेव चिंचपुरे यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत कारचालक निघून चालला होता.

    राजगुरूनगर : गाडीला साईड न दिल्याने कारचालकाने एसटी कर्मचाऱ्यांना दुखापत केल्याची घटना तुकाईवाडी (ता. खेड) येथे घडली. ही घटना मंगळवारी (ता. २३) सकाळी पावणे नऊ वाजता घडली.

    खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदू किसन भालेराव हे एसटी चालक राजगुरूनगर-मंचर एसटीने प्रवाशांसह पुणे नाशिक महामार्गावरून जात होते. त्या दरम्यान तुकाईवाडी येथे टोयाटो कारचालकाने (क्र. एमएच १४ जीपी ९१८२) त्यांना ओव्हरटेक करून एसटीला गाडी आडवी लावावी. गाडीतून उतरत “मला साईड का नाही दिली” असे म्हणून एसटीची पुढील काच फोडली. तसेच चालकाच्या हातास मारहाण केली. त्यावेळी वाहक सारिका नामदेव चिंचपुरे यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत कारचालक निघून चालला होता. त्यावेळी चिंचपुरे यांनी त्याला “आमचे साहेब येईपर्यंत जाऊ नकोस” असे म्हणत गाडीचा वायपर धरून बोनेटवर बसल्या. कारचालकाने त्यांना त्या अवस्थेत १०० फूट पुढे फरफटत नेले. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने त्याने गाडी थांबविली. चिंचपुरे यांनी स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर कारचालक नाशिक दिशेला पसार झाला. याबाबत भालेराव यांनी खेड पोलीस ठाण्यात  संध्याकाळी गुन्हा दाखल केला. या घटनेत भादवि ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६, सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायदा कलम ३ सह १८४ व मोटार वाहन कायद्यान्वये अज्ञात कारचालकाचा शोध पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत.