
तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातील भुयारी गटार योजना व त्याच भागातील विस्तारित पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यावरच त्या ठिकाणी रस्त्याच्या कामांना सुरुवात करावी, अशी सूचना आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीत आमदार शेळके बोलत होते. यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या कालावधीतील पहिलीच आढावा बैठक असल्याने आमदार शेळके यांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे यांच्यासह नगर परिषदेतील सर्व अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार शेळके यांनी नगर परिषदेमध्ये चाललेल्या विकासकामाचा व रखडलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. या कामांमध्ये भुयारी गटर, विकासित पाणी योजना, तळेगाव चाकण रस्ता रुंदीकरणामध्ये येणारे विजेचे खांब, तळेगाव-चाकण व तळेगाव गाव-स्टेशन रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे बसणारे व्यवसायिक, आंध्रा धरणातुन तळेगावसाठी पाणी योजना आणणे, तळेगाव स्टेशन भागात नवीन गॅस दाहिनी बसवणे, ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचे मंदिर जीर्णोद्धाराचे मध्ये राहिलेले सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करणे व तळेगाव शहरामध्ये कोविड 19 चा महालसीकरण उपक्रम राबवणे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन या कामाची पूर्तता कशाप्रकारे होईल, निधीची उपलब्धता कशाप्रकारे होईल. याबद्दल प्रत्येक विभाग प्रमुखाशी सखोल चर्चा करून त्यास गती कशी देता येईल, याबाबत सूचना केल्या.
या आढावा बैठकीचे सभागृहनेते यांनी आयोजन केले होते. पण या आढावा बैठकीस नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभागृहनेते आदी उपस्थित न राहिल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांनी खंत व्यक्त केली. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांचे नाव न घेता नगरपरिषदेची वकिली करण्यापेक्षा हातात हात घालून तळेगावचा विकास करू, असा टोला जिल्हाध्यक्षांना लगावला.
तळेगाव दाभाडे हद्दीमध्ये तळेगाव व स्टेशन विभागात शुक्रवारी 12 ठिकाणी 10 हजार नागरिकांना कोविड 19 ची लस देण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. त्याप्रमाणे पूर्तता करण्याची सूचना प्रशासनाला, आरोग्य विभागाला देण्यात आली.