तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी मी पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग झाला. तळेगाव-चाकण-शिक्रापूर असा हा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

  पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी. त्याचे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

  तळेगाव-चाकण-शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आज (बुधवारी) दिल्लीत बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे, मुख्य अभियंता ओ.पी.श्रीवास्तव बैठकीला उपस्थित होते. बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (‘बीओटी’) तत्वावर मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  तळेगाव-चाकण-शिक्रापूर पहिला राज्य मार्ग होता. त्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग ५४८ -डी म्हणून घोषित केला होता. एनएचआयएने मार्गाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, जमीन अधिग्रहित झाली नाही. त्यामुळे ३ जुलै २०२० मध्ये या कामाला वाइरल पेंडिंग प्रोजेक्टमध्ये सहभागी केले. त्यामुळे त्याचे काम बंद झाले आहे.

  चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त आहे. तळेगाव- चाकण- शिक्रापूर या ५४ किलोमीटर लांब राष्ट्रीय राजमार्गाला बोरीपरधी खंडात सहभागी करावे. त्यासाठी निधीची तरतूद करावी. राष्ट्रीय राजमार्ग चारला हा मार्ग जोडावा. त्यामुळे हा मार्ग सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडला जाईल. पुण्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

  ‘बीओटी’ तत्वावर मार्ग होणार विकसित

  तळेगाव-चाकण-शिक्रापूर रष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी मी पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग झाला. तळेगाव-चाकण-शिक्रापूर असा हा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याबाबत पुन्हा एकदा आज दिल्लीत बैठक झाली. हा मार्ग बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (‘बीओटी’) तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी जागा अधिग्रहित करण्यास मोठा त्रास होतो. तसेच जिथे अरुंद रस्ते आहेत. तिथे ‘ओव्हर ब्रीज’ बांधले जाणार आहेत, असे खासदार बारणे यांनी सांगितले.