पवारसाहेब जनतेची चेष्टा करणे बंद करा ; साेमय्यांची शरद पवारांवर घणाघाती टीका

शरद पवार हे स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणून घेतात, ते खराेखरच जनतेचे कैवारी असतील तर त्यांनी या हप्ता वसुली सरकारपासून जनतेला मुक्त करावे, असे अावाहनही त्यांनी यावेळी बाेलताना केले.

    नाशिक : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा पत्रावरून राज्यात खळबळ उडाली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वेगवेगळ्या कथा तयार करून राज्यातील जनतेची चेष्टा करत आहेत. त्यांनी हे उद्याेग त्वरित थांबवावेत, असे आवाहन भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी नाशिक दाैऱ्यात केले.

    महाविकास आघाडी सरकार या प्रकरणावरून गाेंधळात सापडले असून, त्यांनाच कळत नाही काेणाला काय उत्तर द्यावे आणि काेणावर कारवाई करावी. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून वर्षभरात अनेक घाेटाळे उघडकीस आले, पण आताचा घाेटाळा म्हणजे या सर्वांवरचा कळस आहे. राज्याचे गृहमंत्री एकटे १०० काेटी रुपये घेत असतील तर मग मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वर किती जात असतील? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादीकडे असलेले गृहमंत्रालय आणि नगरविकास मंत्रालय या दाेन्हींचा कारभारही अनिल परब हेच पाहत असल्याचा आराेपही त्यांनी यावेळी बाेलताना केला.

    ते पुढे म्हणाले की, वाझे प्रकरणात सरकारमधील सगळ्याच पक्षांचे नेते काठाेकाठ बुडाले आहेत. मी वाझे प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागितली तर ती फाईल आमच्याकडे नाही, असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने मला दिले. याचा अर्थ ही फाईल येथून गहाळ करण्यात आल्याचे स्पष्ट हाेते. वाझे प्रकरणाची ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग यांच्यामार्फत चाैकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी बाेेलताना केली.

    गृहमंत्री या प्रकरणातून वाचण्यासाठी परमबीर सिंग यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहेत. त्यापेक्षा सरकार तुमचे आहे तुम्ही तात्काळ त्यांना निलंबित का करत नाही, त्यांना निलंबित केले तर तुमची सगळीच प्रकरणे ते बाहेर काढतील, याची भीती वाटते का? शरद पवार हे स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणून घेतात, ते खराेखरच जनतेचे कैवारी असतील तर त्यांनी या हप्ता वसुली सरकारपासून जनतेला मुक्त करावे, असे अावाहनही त्यांनी यावेळी बाेलताना केले.