प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपी अख्तर याने उपनिरीक्षक झेंडे यांच्या वतीने ७० हजार आणि स्वतःसाठी १५ हजार अशी एकूण ८५ हजार रुपये लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. ही लाच घेताना एसीबीने अख्तर याला रंगेहाथ पकडले.

    पिंपरी: कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षकाने एका खाजगी व्यक्तीच्या मदतीने ८५ हजाराची लाच घेतल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी कारवाई केली. या कारवाईत एका खाजगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले असून उपनिरीक्षक पसार झाला आहे.अख्तर शेखावत अली शेख (वय ३५) असे अटक केलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासह पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७, ७ अ, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

    एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज आला आहे. त्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक झेंडे यांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे केली.

    याबाबत एसीबीने बुधवारी पडताळणी केली. त्यात आरोपी अख्तर याने उपनिरीक्षक झेंडे यांच्या वतीने ७० हजार आणि स्वतःसाठी १५ हजार अशी एकूण ८५ हजार रुपये लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. ही लाच घेताना एसीबीने अख्तर याला रंगेहाथ पकडले. दरम्यान उपनिरीक्षक झेंडे पसार झाले. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एसीबी पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.