चोरटयांना बघून धूम ठोकणाऱ्यांवर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

पोलिसांचा पळून जाण्याच्या प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की झाल्याने ही कारवाई कारण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

पुणे: औंध परिसरातील शैलेश टॉवर येथे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटयांना पकडण्याऐवजी घाबरून पळालेल्या पोलीस कर्मचारी हवालदार प्रविण गोरे आणि पोलीस नाईक अनिल अवघडेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचा पळून जाण्याच्या प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की झाल्याने ही कारवाई कारण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती. यामुळे शहर पोलीस दलाची बदनामी झाल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हवालदार प्रविण गोरे आणि पोलीस नाईक अनिल अवघडे हे औंध येथे मार्शल म्हणून कर्तव्यास होते. शैलेश टॉवर येथे सुरक्षारक्षकाला मारहाण करीत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती या दोघा बीट मार्शल यांना दिली. त्यानुसार हे मार्शल सव्वातीन वाजता त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी एसएलआर रायफल असणारे अवघडे मोटारसायकलवरुन खाली उतरले. त्याचवेळी शैलेश टॉवरच्या आवारातून ४ शस्त्रधारी चाकू, कटावणी व गज घेऊन या मार्शलच्या समोरुन जाऊ लागले. ते पाहून मोटारसायकलवरील गोरे यांनी आपले सहकारी अवघडे यांना तेथेच सोडून मोटारसायकल वळवून पळून गेले. चोरट्यांपैकी एकाने अवघडे यांना मारण्याकरीता त्यांच्या हातातील कटावणी उगारली व दुसऱ्याने गाडी निकालो और इनको ठोक दो असे म्हणाला. इतर चोरट्यांच्या हातात चोरीचे सामान होते. अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असून देखील त्यांनी या चोरट्यांना अटकाव करण्याचा, पकडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चोरटे पळून गेल्यानंतरही त्यांचा पाठलाग केला नाही.