प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा झालेला तसेच शहर व जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. तो तडीपारी काळात देखील पत्नीला भेटण्यास आला होता. त्यावेळी त्याला पोलीसांनी पकडले आहे.

    पुणे : खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा झालेला तसेच शहर व जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. तो तडीपारी काळात देखील पत्नीला भेटण्यास आला होता. त्यावेळी त्याला पोलीसांनी पकडले आहे.

    वसीम फक्रुद्दीन शेख (वय 33, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वसीम शेख याने 2009 मध्ये एका रिक्षाची काच फोडली होती. त्यावरून रिक्षाचालक नंदलाल नाईक यांनी शिवीगाळ केली होती. त्याचा राग वसीमच्या मनात होता. या रागातूनच त्याने तलवारीने नंदलाल यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपयांच्या दंड केला होता. परंतु, त्याने याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले. त्याबाबत सुनावणी सुरू आहे.

    दरम्यान, त्याला या गुन्ह्यात जामिन मिळाला होता. यानंतर त्याला परिमंडळ एकच्या उपायुक्तांनी शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. परंतु, तो तडीपार काळात देखील पुण्यात येत होता. यादरम्यान, युनिट एकमधील अमोल पवार यांना माहिती मिळाली की, वसीम हा कात्रजमधील त्याच्या घरी पत्नीला भेटण्यास येणार आहे. त्यानुसार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने सापळा रचून पकडले. वसीम हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत.