‘त्या’ पिता-पुत्रावर मोक्काअंतर्गत कारवाई करा; लाखेवाडीतील ६२ कुटुंब करणार उपोषण

  इंदापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पन्नास लाख रुपयांची खंडणी द्या. अन्यथा घरे उद्ध्वस्त करू, अशी धमकी देणाऱ्या  पुण्यासह परजिल्ह्यात २० ते २५ गुन्ह्यांची नोंद असलेल्या खाडे पिता-पुत्रांवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील ६२ कुटुंबांनी १ ऑक्टोबरपासून तेथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

  प्रभाकर तुकाराम खाडे, संतोष प्रभाकर खाडे, प्रदीप प्रभाकर खाडे (तिघे रा.लाखेवाडी, ता. इंदापूर) अशी खाडे पितापुत्रांची नावे आहेत. सोमनाथ गायकवाड, आबासाहेब खाडे, दत्तात्रय कांबळे, संगीता जगताप, चंद्रकांत ढोले, राजू मुलाणी व इतर अशा एकूण ६२ जणांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तक्रारीसोबत खाडे पिता पुत्रांविरोधात पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असणा-या गुन्ह्यांची माहिती, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून जमा करुन ग्रामस्थांनी राज्यपाल व इतर संबंधितांकडे पाठवली आहे.

  ग्रामस्थांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, सन १९७६ मध्ये महाराष्ट्र शासनाने लाखेवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट क्र.५०६ मधील ९१.२४ एकर क्षेत्रापैकी ४५ एकर जमीन प्रत्येकी पाच एकरप्रमाणे नऊ जणांना दिली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या घरकुल योजनांसाठी तेथे अनेक जणांना प्रत्येकी एक-एक गुंठ्याचे वाटप केले आहे. तेथे पक्की घरे उभी आहेत. सात बाराच्या उता-याला तश्या नोंदी आहेत.

  सहकारी महर्षी सहकारी साखर कारखान्याचे गट सेंटर ही तेथे आहे. शासकीय वन जमिनीवर कोणी ही अतिक्रमण केलेले नाही. या पार्श्वभूमीवर शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा करत खाडे पिता-पुत्र गेल्या अनेक वर्षांपासून पन्नास लाख रुपयांची खंडणी द्या. नाहीतर तुमची घरे उद्ध्वस्त करुन तुम्हाला बेघर करुन टाकतो, अशी धमकी देत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

  खाडे पिता पुत्रांवर पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, लोकांच्या विहिरीवरील मोटारी, लाईटच्या वस्तू चोरणे, वाटमारी करणे अशा प्रकारच्या वीस ते पंचवीस गुन्ह्यांची नोंद आहे. गावातील बऱ्याच लोकांच्या जमिनी त्यांनी लाटल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे त्यांच्या मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  लाखेवाडी गावठाणाच्या पश्चिमेला शासनाचा कोणताही कायदेशीर परवाना न घेता खाडे पिता पुत्रांनी जय संतोषी माता हॉटेल हे चालू केले आहे. हॉटेलच्या बांधकामासाठी जमीन बिगरशेती केलेली नाही. तेथे बेकायदेशीररित्या दारु, गांजा व अंमली पदार्थांची खुलेआम विक्री केली जाते, असेही ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.