‘ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं’ – प्रविण दरेकर

क्रीडा संकुलातील हे ट्रॅक अतिशय कुशलतेने बनवल्या जातात व त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते. तसेच ह्या ट्रॅकविषयी क्रीडापटुंच्या मनामध्ये आपुलकीची भावना असते. क्रीडापटूंच्या भावनांची थट्टा उडविणारे हे कृत्य करणाऱ्या नेत्यांचा व त्यांच्या या कृतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

    पुणे: ‘राज्यातील क्रीडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडी मधील नेते व मंत्री पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलातील रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

    बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या सिंथेटिक रेस ट्रॅकवर व्हीआयपी गाड्या नेेण्यावरून क्रीडा क्षेत्रासह सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्यात भाजपही आघाडीवर आहे. आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याच प्रकारावरून टीकेची झोड उठविली आहे.

    राज्यात अगोदरपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये. रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रात स्पोर्ट्सचं वैभव आहे. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात, स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतो. महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात स्पोर्ट्सला चालना देण्यात आली नाही.ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो,अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.