‘त्या’ महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न

कसबा परिसरामध्ये ११ नोव्हेंबर रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू हार्ट अटॅक म्हणून झालेला आहे, परंतु सदर हार्ट अटॅक नसून घातपात आहे याबाबतची कुजबूज त्या परिसरामध्ये सुरू होती. सदरची कुजबूज काही दिवसानंतर पोलिसांच्या कानावर आली. सदर बाबत बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली.

    बारामती : शहातील कसबा परिसरातील ५० वर्षीय महिलेचा हृदय विकाराने मृत्यू झालेला नसून खुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी या महिलेच्या मित्राचा मुलगा व मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.स्वाती विनय आगवणे (वय ५०) असे या मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी ऋषिकेश प्रमोद फडतरे (वय ३४) व मुलगी अनुजा प्रमोद फडतरे ( वय ३३) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबतची माहिती अशी की,कसबा परिसरामध्ये ११ नोव्हेंबर रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू हार्ट अटॅक म्हणून झालेला आहे, परंतु सदर हार्ट अटॅक नसून घातपात आहे याबाबतची कुजबूज त्या परिसरामध्ये सुरू होती. सदरची कुजबूज काही दिवसानंतर पोलिसांच्या कानावर आली. सदर बाबत बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुद्धा सदर बाबत गोपनीय माहिती काढून वस्तुस्थिती काय आहे याबाबत आढावा घेण्यास सांगितले.

    सदर ठिकाणी कुणीही उघड माहिती सांगत नव्हता .सदर घटनेबाबत कुणीही उघडपणे तक्रार देत नव्हता. त्यामुळे संशयित व्यक्तीकडे चौकशी करणे जिकरीचे झाले होते. पोलिसांसमोर जो घटनाक्रम उभा राहिला होता, त्या घटनाक्रमामध्ये असणाऱ्या लोकांना पोलिसांनी चौकशीला बोलावले, त्यामधून अशी माहिती निष्पन्न की, मयत महिला स्वाती विनय आगवणे ( रा. कसबा, बारामती) यांचे कसबा भागात मध्ये राहणारे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे (वय ६३ वर्षे रा. कसबा बारामती )यांच्या सोबत दहा वर्षापासून मैत्रीचे संबंध होते. प्रमोद उर्फ दादा हे कसबा येथे त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी , सुन व पत्नी यांच्यासोबत राहत होते. प्रमोद फडतरे यांचा कसबा भागामध्ये फडतरे वाडा म्हणून दुसरे जुने घर आहे. त्या घरामध्ये मयत व प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे हे अधून मधून एकमेकांना भेटायचे ,याची कल्पना मयत व प्रमोद दादा फडतरे यांच्या कुटुंबीयांना होती. दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्या या मैत्रीचा व भेटण्याचा राग होता. ती गोष्ट त्यांना आवडत नव्हती .प्रमोद फडतरे यांचे मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी अनुजा प्रमोद फडतरे यांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता याबाबत मयत व प्रमोद फडतरे यांच्यासोबत या दोघांनी पूर्वीसुद्धा भांडण केले होते. दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे यांचा वाढदिवस होता. यादिवशी रात्री वाड्यावर त्यांनी मयत महिलेला बोलून घेतले. काही वेळानंतर ते दोघे फडतरे वाड्यावर आहेत, याबाबतची माहिती मुलगा ऋषिकेश व मुलगी अनुजा यांना कळाली. त्यानंतर ते दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी रागाच्या भरात मध्ये मयत महिला व प्रमोद नामदेव फडतरे या दोघांना काठीने मारहाण केली. मारहाणी नंतर मयत महिला निपचित पडली. व प्रमोद फडतरे जखमी झाले. नंतर प्रमोद फडतरे व आरोपी ऋषिकेश व त्याची बहीण अनुजा यांनी सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले .परंतु रात्रीची वेळ असल्याने वाहन उपलब्ध झाले नाही त्यानंतर सदर ऋषिकेश याने त्याचे कौटुंबिक डॉक्टर फिर्यादी सुनिल पवार यांना मोबाईल द्वारे त्यांनी मारहाण केल्याबाबत कळवले .रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. परंतु आरोपी व जखमी प्रमोद यांनी वाहन उपलब्ध न झाल्याने दवाखान्यात नेले नाही. नंतर ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्यानंतर त्यांना डॉक्टर भोईटे यांच्या हॉस्पिटलला नेण्यात आले त्याठिकाणी नेल्यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी सदर महिला मृत झाली आहे. तिचे शवविच्छेदन करण्यासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटल ला नेण्यास सांगितले. सदर महिला मयत आहे हे कळल्यानंतर आरोपी दोघेही घाबरून गेले. त्यांनी परत सदरचे प्रेत मूळ ठिकाणी फडतरे वाड्या वर घेऊन आले. त्यानंतर त्यांनी सदरची घटना मयताचे नातेवाईक मुलगा व मुलगी यांच्या कानावर सांगितले .त्यांना सांगितले की सदर महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या वडीलांकडे आली असताना तिला हार्ट अटॅक आलेला आहे. त्या दोघांनी शंका उपस्थित केल्याने आरोपी ऋषिकेश व मयाताचा मुलगा व मुलगी यांनी प्रेत परत डॉक्टर पवार यांच्याकडे घेऊन गेले .त्याठिकाणी डॉक्टर पवार यांनी सदर चा मृत्यू चार-पाच तास अगोदर झाल्याचे सांगितले .परंतु सदर मृत्यू कशाने झाला आहे ,हे त्यांना माहीत नसल्याचे सांगितले. त्यांना जर माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी त्या प्रेताचे शवविच्छेदन करावे. परंतु सदर प्रेतावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा दिसून येत नसल्याने व केवळ नाकातून किरकोळ रक्त आल्याने व सदर महिला घसरून पडून अटॅक आल्याबाबत आरोपी यांनी सांगितल्याने व प्रमोद उर्फ दादा फडतरे यांनाही मारहाण झालेली होती .परंतु आरोपी हे त्यांची मुले असल्याने त्यानेही काही वस्तुनिष्ठ माहिती त्यांना दिली नाही. त्यामुळे त्यांचाही ग्रह झाला की सदर चा मृत्यू हा अटॅकने झाला असेल. नंतर मयताच्या नातेवाईकांनी सोपस्करपणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मयताचा अंत्यविधी करून टाकला.त्यानंतर आरोपी इसमांनी त्यांचे वडील प्रमोद उर्फ दादा फडतरे यांना डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. दादा फडतरे हेसुद्धा वयोवृद्ध असल्याने व त्यांना घटनेचा शॉक असल्याने त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांच्या अंगावर काठीच्या जखमा व काळेनिळे वन होते, तरीही त्याबाबत येथे काही बोलत नव्हते काही दिवस गेल्यानंतर त्यांनी सदर घटनेबाबत डॉ पवार यांना हकिकत कथन केली. परंतु डॉ पवार हे त्यांचे फॅमिली डॉक्टर असल्याने व प्रमोद फडतरे हे आरोपी यांचे वडील असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारची फिर्याद दिली नाही. घटना क्रमा मध्ये डॉक्टरांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले नंतर दखलपात्र गुन्हा डॉक्टरांच्या जबाबावरून निष्पन्न झाला.

    पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपी ऋषिकेश फडतरे व त्याची बहीण यांनी गुन्हा केल्याची कबुली प्रथम डॉक्टरांकडे दिल्याने व साक्षीदार प्रमोद फडतरे यांनी सुद्धा घटनेबाबत डॉक्टरांना सांगितल्याने. त्यांची प्रथम खबरी अहवाल घेऊन या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. सदर आरोपींना आज न्यायाधीश जाधव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली. सरकारी वकील म्हणून सोनवणे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे ,पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक संजय जाधव व संपूर्ण डीबी पथक करत आहे. सदर ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळवणे व भौतिक पुरावे शोधून आरोपींना जास्तीत जास्त सजा होण्यासाठी पोलीस बारकाईने तपास करत आहेत. यामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल या अटीवर त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.