ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यभर आंदोलन सुरुच राहणार : बाळा भेगडे

    वडगाव मावळ : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जाण्यास जबाबदार ठरवत भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात जागे करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आज मावळ तालुक्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ऊर्से टोलनाक्याजवळ भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

    या चक्का जाम आंदोलनात भाजपचे माजी राज्यमंत्रीसह भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे रविंद्र भेगडे, यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज दहा वाजल्यापासून हे चक्काजाम आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तर या मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    या आंदोलनात मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याने ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे. तसेच ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यभर आंदोलन चालूच राहणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.