दुर्लक्षित सुळक्यावर गिरिप्रेमींची चढाई ; सुळक्याचे नामकरण ‘कमळजाई’

पुणे :  पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या सात गिर्यारोहकांनी नाणेघाट परिसरातील फानगुळ गव्हाण गावानजिक असणाऱ्या,  एका नव्या सुळक्यावर नुकतेच  यशस्वीरित्या चढाई केली. या संघाने सुळक्याचे नामकरण 'कमळजाई' असे केले असुन,गावात असणाऱ्या कमळजाई देवीच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.

पुणे :  पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या सात गिर्यारोहकांनी नाणेघाट परिसरातील फानगुळ गव्हाण गावानजिक असणाऱ्या,  एका नव्या सुळक्यावर नुकतेच  यशस्वीरित्या चढाई केली. या संघाने सुळक्याचे नामकरण ‘कमळजाई’ असे केले असुन,गावात असणाऱ्या कमळजाई देवीच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. सुळक्याची उंची शंभर फूट तर प्रस्तरारोहणाची उंची एकशेतीस फूट आहे. यापूर्वी सुळक्यापर्यंत कोणीही न गेल्यामुळे पायथ्यापर्यंत  पोहचण्यासाठी वाट नव्हती, या सर्व गिर्यारोहकांना  दाट जंगलातून पाठीवर प्रस्तरारोहणाचे जड साहित्य घेउन वाट शोधावी लागली. या चढाईत  कृष्णा ढोकळे, रोहन देसाई, डॉ. सुमित मांदळे, अंकित सोहोनी,  मारिशा शहा, ऐश्वर्या घारे, अभिराम आपटे या सदस्यांनी सहभाग घेतला. या चढाईकरिता फ्रेंडस्ा, बॉल नटस, पिटॉन्स बोल्ट, नॅचरल अॅन्कर्स  या प्रस्तरारोहणातील उपकरणांचा वापर करण्यात आला. एकशेतीस  फूटांच्या या चढाईत दोन स्टेशन्स लावण्यात आले होते. ठिसूळ कातळ, आणि मधल्या टप्प्यात असणाऱ्या ओव्हरहँग(नव्वद अंशापेक्षा अधिक कोनातील चढाई )आणि अंतिम टप्प्यात असणाऱ्या स्क्री (घसारा )मुळे ही चढाई अधिक आव्हानात्मक झाली होती. या सर्व गिर्यारोहकांनी ही सर्व आव्हाने पेलत अवघड असे प्रस्तरारोहण करुन शिखर गाठण्यात यश मिळविले व गिरिप्रेमीची नवनव्या सुळक्यांवर चढाई करण्याची चालत आलेली परंपरा अखंडपणे अशीच चालत राहील हे सिद्ध केले.