मोशी येथील बास्केटबॉल मैदानाला मिळणार नवसंजीवनी; महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचा पुढाकार

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे बास्केटबॉल मैदान दुरावस्थेमुळे निरुपयोगी ठरत आहे. यामुळे बास्केटबॉल खेळाडूंसह नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी.

  पिंपरी: मोशी येथील प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या बास्केटबॉल मैदानाला आता नवसंजीवनी मिळणार आहे. महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, लवकर कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोशी प्राधिकरणातील बास्केटबॉल मैदानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकारी संदीप खोत यांची भेट घेतली.

  यावेळी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे गणेश लांडगे, सुरज लांडगे, मयूर लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले, त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक नऊमध्ये अद्ययावत असे बास्केटबॉल मैदान उभारले आहे. यामुळे बास्केटबॉल प्रेमी, खेळाडू यांसह शहराच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. मात्र, दोन कोटी ९७ लाख ५० हजार ६५२ रुपये खर्च करून उभारलेल्या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून खेळण्यायोग्य राहिले नाही. यामुळे मैदानाची देखभाल दुरुस्ती करून ते खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी आहे.

  या बास्केट बॉल मैदानामध्ये एकूण तीन बास्केट बॉल कोर्ट , एक सराव कोर्ट , प्रेक्षक गॅलरी याबरोबरच नागरिकांसाठी एक जॉगिंग ट्रॅकही आहे. त्याबरोबर एक प्रदर्शन सभागृह, एक पेडिकल खोली, स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे, कार्यालय आदी सुविधा असलेले प्रशस्त क्लब हाऊस उभारण्यात आले आहे. दरम्यान देखभाली अभावी मैदानाची दुरवस्था झाली आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे स्वयंसेवकांनी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता बास्केटच्या तुटलेल्या जाळ्या, तडे गेलेले मॅट, जॉगिंग ट्रॅकवर साचलेले गवत, कचरा आणि प्लास्टिक बाटल्यांमुळे अस्वच्छता अशा एक ना अनेक बाबी निदर्शनास आल्या आहेत.

  परिसरातील बास्केटबॉलपटूंमध्ये खंत

  पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरीसोबतच क्रीडा नगरी म्हणून उदयास येत आहे. अनेक कुशल खेळाडू पिंपरी चिंचवडमध्ये तयार झाले असून शहराचे नाव उंचावत आहेत. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे कुशल खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन आणि मदत केली जाते. मात्र, खेळामध्ये सराव आणि त्यासाठी असणाऱ्या अनुरूप बाबीही तितक्याच महत्वाच्या असतात. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे बास्केटबॉल मैदान दुरावस्थेमुळे निरुपयोगी ठरत आहे. यामुळे बास्केटबॉल खेळाडूंसह नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

  सुरक्षारक्षकाची गरज

  बास्केटबॉल मैदानाची देखभाल दुरुस्ती करून तात्काळ खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे, बास्केटबॉल मैदानात प्रशिक्षक तसेच मैदान आणि ट्रॅकच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमावा, भविष्यातील देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेबाबत आवश्यक नियोजन करावे, तसेच बास्केटबॉल खेळाला चालना देण्यासाठी भविष्यात स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

  अधिकारी काय म्हणाले…?

  गेल्या दीड वर्षांमधील कोविड परिस्थितीमुळे बास्केटबॉल मैदानाच्या दुरवस्थेकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहेत. मात्र, आगामी दोन महिन्यांमध्ये देखभाल दुरुस्तीच्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यापूर्वीच बास्केटबॉल खेळाणारे राष्ट्रीय खेळाडू यांनी प्रशासनाशी संपर्क साधला होता. त्यांच्या समस्यांचीही आम्ही नोंद घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात बास्केटबॉल मैदानाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती गणेश लांडगे यांनी दिली.