fraud

पुणे जिल्ह्यातील एका आर्थिक गैरव्यवहारात घसरून कुलुप लागलेल्या सहकारी बँकेत या व्यापाऱ्याच्या नावावर अडचणीत आलेल्या संस्था चालकाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याची चर्चा आहे. या संस्थाचालकाने कर्ज काढून हातात धतुरा दिल्याने हे कारण या व्यापाऱ्याचे दिवस फिरण्यास कारणीभूत ठरले आहे. या ठकाला पण एक महाठक भेटल्याची चर्चा परिसरात आहे.

  ऊरुळी कांचन : बेकायदेशीर गुंतवणुकीच्या व भिशीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर सह परिसरातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या पितापुत्रांच्या गुजरात पोलिसांनी अखेर पाकिस्तानच्या सीमेवरुन रविवारी (दि. २०) अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. भरतकुमार चरणदास जोशी आणि त्याची दोन मुले हिरेनकुमार जोशी व दीपककुमार जोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

  भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या व्यापाऱ्याने उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर सह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या आसामीकडून सुमारे दोनशे कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबिंयासह उरुळी कांचन येथून पोबारा केल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी पळाल्याची घटना पूर्व हवेलीत मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या व्यापाऱ्याकडे बडे व्यावसायिक मोठ्या रक्कमांची गुंतवणूक भिशीत करीत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला होता. या भिश्यांमध्ये गुंतवणूकदारांचा आकडा शेकडोपर्यंत पोहोचला होता. या व्यापाऱ्याने भिशीत गुंतवणूक करणाऱ्या शेकडो गुंतवणूकदारांच्या हातावर तुरी देऊन गंडा घातला होता. तो पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते.

  तोंड दाबून बुक्क्यांचा मार
  लॉकडाउनपूर्वी भिशी उचलणाऱ्यांनी, लॉकडाउन सुरु होताच भिशीचे पैसे वेळेवर देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने या ‘शेठ’चा बाजार उठण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात व्यापाऱ्याच्या पत्नीला कोरोना झाल्याने उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, व्यापारी रातोरात स्वतः व नंतर परिवाराला घेऊन गायब झाला. या व्यापाऱ्याच्या घराकडे चकरा मारुन मारून गुंतवणुकदाराना चक्कर येऊ लागल्याने या प्रकाराचे बिंग फुटले होते. दरम्यान, भिशी चालविणारा व्यापारी फरार झाल्याने भिशीत पैसै अडकणाऱ्या केवळ ५ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र भिशी व्यतिरिक्त सबळ कारणाअभावी तक्रार नोंदली जात नसल्याने ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली होती.

  इकडे आड तिकडे विहीर
  पूर्व हवेली मधील पाचशेहून अधिक ‘बड्या’ गुंतवणुकदारांकडून दोनशे कोटीहून अधिक रुपयांची माया गोळा करुन, आपल्या कुटुंबीयासह उरुळी कांचन येथून ऑगस्ट २०२० ला भरतकुमारने धूम ठोकली होती. त्यामुळे पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली होती. उरुळी कांचन व परिसरात ‘शेठ’ या टोपण नावाने फेमस असलेला भिशी चालक कुटुंबियासह महिना भरापासून फरार झाला होता. ‘शेठ’कडे गुतंवलेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पोलिसांना कसा दाखवायचा या भीतीने गुंतवणुकदारांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. मात्र, उरुळी कांचन गावातील काही गुंतवणुकदारांनी पुढे येऊन सप्टेंबर २०२० ला ‘शेठ’च्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात लेखी स्वरुपात तक्रार दिली होती.

  ठकास महाठक भेटला
  पुणे जिल्ह्यातील एका आर्थिक गैरव्यवहारात घसरून कुलुप लागलेल्या सहकारी बँकेत या व्यापाऱ्याच्या नावावर अडचणीत आलेल्या संस्था चालकाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याची चर्चा आहे. या संस्थाचालकाने कर्ज काढून हातात धतुरा दिल्याने हे कारण या व्यापाऱ्याचे दिवस फिरण्यास कारणीभूत ठरले आहे. या ठकाला पण एक महाठक भेटल्याची चर्चा परिसरात आहे.