आयुक्त तुकाराम सुपेच्या घरात सापडले घबाड; पोलीसही आवाक

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तर राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती आहे.

    पुणे : टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी अटक केलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी पोलिसांनी घबाड झापडले आहे. आज पुन्हा टाकण्यात आलेल्या या धाडीत कोट्यवधी रुपये सापडले आहेत.

    टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तर राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती आहे. क्लास चालक आणि इतर व्यक्ती यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांची ८ पथके त्यांचा शोध घेत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरात ही पथके गेली असून, साखळीतील व्यक्तींना लवलरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

    दरम्यान पुणे पोलिसांनी आज सुपेच्या पिंपरी चिंचवड परिसरातील घरी धाड टाकली आहे. त्यात कोट्यवधी रुपये व दागिने मिळून आले आहेत. येथून दीड कोटींची रोकड आणि ५० लाखाहून अधिक दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. तर अभिषेक याच्या देखील घराची झडती पोलीस घेण्याची शक्यता आहे. तुकाराम सुपेला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीने हा सर्व ऐवज तिच्या भावाकडे (मेव्हण्याकडे) दिला होता, असेही समोर आले आहे. पोलिसांनी यापूर्वी देखील धाड टाकत सुपेच्या घरातून ८८ लाख रुपये आणि इतर ऐवज असा ९६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता.

    टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात आरोपी प्रितिष देशमुख तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर या तिघांनी मिळून चार कोटी २० लाख रुपयांची कमाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एक कोटी ७० लाख रुपये सुपेला मिळाले होते.