सर्पमित्रांनी उधळून लावला अंधश्रद्धेचा डाव; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात

सर्पमित्रांनी तेथे जात पाहणी केली असता काही युवक सर्पदंश झालेल्या युवकाला पकडून एका व्यक्तीच्या मदतीने अंधश्रद्धेपोटी त्याचावर काही मंत्राचा, लिंबूचा वापर करत असल्याचे दिसले. त्यांनतर याबाबतची माहिती सर्पमित्रांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांना दिली

शिक्रापूर:शिरूर गणेगाव खालसा येथील गजानन थोरात यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना अंकुश वाघ या उसतोड कामगाराला विषारी सापाने दंश केला. त्यांनतर अंकुश याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, परंतु पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अंकुश वाघ आणि त्याचे नातेवाईक ससून येथून निघून आले आणि गणेगाव खालसा येथे एका मांत्रिकाकडे जाऊन अंधश्रद्धेपोटी सापाचे विष उतरविण्याचा प्रकार करू लागले.
दरम्यान पुन्हा एका ऊसतोड कामगाराला साप चावला असून त्याचेवर सध्या गणेगाव खालसा येथे एक मांत्रिक उपचार करत असल्याचे वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख, श्रीकांत भाडळे यांना समजले. त्यावेळी त्यांनी गजानन थोरात, स्वप्नील थोरात यांच्यासह तेथे जात पाहणी केली असता काही युवक सर्पदंश झालेल्या युवकाला पकडून एका व्यक्तीच्या मदतीने अंधश्रद्धेपोटी त्याचावर काही मंत्राचा, लिंबूचा वापर करत असल्याचे दिसले. त्यांनतर याबाबतची माहिती सर्पमित्रांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिली असता रांजणगाव पोलीस स्टेशनचे माणिक काळकुटे, व्ही. पि. मोरे, गणेगाव खालसाचे पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी त्या ठिकणी धाव घेत सर्पदंश झालेल्या युवकाला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात हलविले आणि मंत्रिकीच्या हेतूने अंधश्रद्धा पसरविणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. तर सदर रुग्णावर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करत त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे मात्र वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे रुग्ण धोक्यातून बाहेर आला असल्याचे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांनी सांगितले.  तसेच शेतात ऊसतोड सुरु असलेल्या शेताची या पाहणी केल्यानंतर सर्पमित्रांना तेथे विषारी घोणस जातीचा साप असल्याचे आढळून आला, असता सर्पमित्रांनी त्या सापाला पकडले.

अंधश्रद्धा पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पहिले 

सर्पदंश झाल्यानंतर त्याचेवर हॉस्पिटलमध्ये उपचार करणे गरजेचे आहे, साप चावल्यानंतर त्यावर मांत्रिकाच्या सहाय्याने अंधश्रद्धेपोटी मंत्र, तंत्र, गंडे, दोऱ्याचा वापर कोणी करत असेल तर त्याचेवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सांगितले.

सदर इसमावर गुन्हा दाखल केला जाईल 

गणेगाव खालसा येथे अंधश्रद्धेपोटी सापाचे विष उतरविण्याचा प्रकार सुरु असताना साप चावलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचेवर चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.