महाविकास आघाडी सरकारबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये भले कितीही धुसफूस सुरू असली, तरी सध्या सरकारचं काम चांगलं सुरू आहे.

    माळेगाव/वसंत मोरे : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये भले कितीही धुसफूस सुरू असली, तरी सध्या सरकारचं काम चांगलं सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल, असे संकेत दिसून येत आहेत. त्याचवेळी शरद पवार ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ उतरले आहेत. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे महाविकास सरकार पाच वर्षे चांगले काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पाच वर्ष सरकारला कोणताही धोका नाही असेही, पवार यांनी स्पष्ट केले.

    बारामतीत पत्रकारांशी आज ते बोलत होते. ते म्हणाले, सरकार स्थापन झाले तेव्हा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता. सरकार चालविताना काही अडचणी येऊ शकतात. त्यावर कसा मार्ग काढायचा अशी चर्चा झाली, तेव्हा उद्भवलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई या सहा जणांची कमिटी करण्यात आली आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना हे सहा जण एकत्र बसून निर्णय घेतात. त्यामुळे सरकारचं काम योग्य दिशेने सुरु आहे. पाच वर्षांचा कार्यकाल हे सरकार चांगल्या कामांनी पूर्ण करेल, यात माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, असेही पवार म्हणाले.

    दुसरीकडे, सरकार चालवत असताना प्रत्येक पक्षाची संघटन शक्ती मजबूत करण्यासाठी देखील सर्वांना मुभा आहे. आपला पक्ष वाढवण्यासाठी सर्व पक्षातले कार्यकर्ते नेते आपापल्या परीने प्रयत्न करू शकतात. त्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असेही स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले.