ससून रुग्णालयातून खूनातील आरोपी पळाला; राहत्या घरी सापडला

किशोर शिरसाठ याने सप्टेंबर महिन्यात कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या पाठित चाकू घुपसून खून केला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवाणगी येरवडा कारागृहात केली होती.

    पुणे : खूनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणाऱ्या आरोपीला उपचारासाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर त्याने रुग्णालयातून पळ काढल्याचा प्रकार घडला. परंतु, बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी त्याला काही तासातच त्याच्या घरातून पकडण्यात आले.
    किशोर आत्माराम शिरसाठ (वय ३९) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर शिरसाठ याने सप्टेंबर महिन्यात कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या पाठित चाकू घुपसून खून केला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवाणगी येरवडा कारागृहात केली होती. दरम्यान, तो आजारी असल्याने त्याला १५ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या रखवालीसाठी दोन पोलीस देखील तैनात होते. परंतु, त्याला आज ससून रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले होते. सोडल्यानंतर तो लघुशंका करण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात गेला. मात्र, त्याने स्वच्छतागृहाच्या खिडकीतून धूम ठोकली. हा प्रकार सकाळी घडला. काही वेळातच पोलीसांना याची खबर लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बंडगार्डन पोलीस व बंदोबस्तावरील पोलीसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. येरवडा पोलीसांना देखील याची माहिती देण्यात आली होती. त्याच्या घरी पोलीसांनी छापा टाकला असता किशोर पोलीसांना घरी मिळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.