लोणी काळभोर परिसरात तरुणाचा गळा दाबून खून ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

    पुणे : लोणी काळभोर परिसरात तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खुनाचे कारण व आरोपी अज्ञात असून, त्याचा शोध घेतला जात आहे.विजय उर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय २३, रा. पाषणकरबाग, लोणी काळभोर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विजयचा भाऊ रोहित यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे कुटुंब येथील पाषाणकरबाग येथे राहते. विजय याला दारूचे व्यसन होते. तो सतत नशेत असायचा. तो बिगारी काम करत होता. दरम्यान सोमवारी सकाळी विजयचा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात पाण्याच्या टाकीजवळ मृतदेह आढळून आला. नागरिकांनी ही माहिती लोणी काळभोर पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याचा दारूने मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता. नातेवाईक देखील हेच समजत होते. परंतु, डॉक्टरांच्या तपासणीत त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासला सुरुवात केली आहे. त्यामुळे विजयचा खून कोणी आणि का केला याचा उलघडा अद्याप झालेला नाही. त्याची उकल करण्याचे काम पोलीस करत आहेत.