Announcement of the first digital census in the budget; Paperless administration of Modi government

-दीड वर्षापासून या कामाला ब्रेक

  पिंपरी : कोरोना महामारीने अनेक कुटुंब उद्धवस्त केली. अनेकांचे रोजगार हिरावले. अनेक क्षेत्र डबघाईस आली. त्याचबरोबर विकासात्मक कामांनाही ब्रेक बसला.तसाच फटका हिंदुस्थानच्या सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेलाही बसला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये हिंदुस्थानची जनगणना सुरू होणार होती. त्याबाबत महाराष्ट्रात महानगरनिहाय ‘मास्टर ट्रेनर’ही नेमले होते. मात्र कोरोना महामारीमुळे दीड वर्षापासून या कामाला ब्रेक बसला आहे.

  आतापर्यंत जनगणना कागदावरील तक्तयातील माहिती लिहून भरली जात होती. यंदा मात्र प्रथमच विशिष्ट अ‍ॅपद्वारे मोबाईलच्या सहाय्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन मोबाईलमध्येच माहिती भरून जनगणना केली जाणार होती. गत वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने डोके वर काढले. तेव्हापासून विविध बाबींवर निर्बंध आले. शासनाने जनहितासाठी सुरू केलेल्या जनगणनेलाही तेव्हापासून ब्रेक बसला तो आजपर्यंत कायम आहे. ब्रिटिशांनी १८८१ मध्ये हिंदुस्थानात पहिल्यांदा जनगणना सुरू केली होती. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना होते.

  दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेवरून नागरिकांचा आर्थिक स्तर, राहणीमान, गुंतवणुकीचा कल, व्यवसाय, रोजगार कोणता अधिक आहे, कोणत्या क्षेत्राकडे त्याचा कल आहे, किती नोकरदार आहेत, किती स्वत: चा उद्योग करतात, शेतकरी किती, विविध तज्ज्ञ क्षेत्रातील संख्या किती ? कोणत्या जाती, धर्म, पंथाचे किती नागरिक राहतात, स्त्री – पुरुष प्रमाणाचे गुणोत्तर किती आहे, रोजगार किती जणांना, किती बेरोजगार आहेत आदी बाबतची एकत्रित माहिती शासनाकडे संकलित होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करावी याचे धोरण संसदेत ठरविले जाते.

  राष्ट्रीय जनगणनेचे काम एक मार्च २०२१ पासून सुरू होणार होते. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने जारी देखील केली होती. त्यानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२० मध्ये जनगणनेची तयारी सुरू केली. सहायक आयुक्त अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती केली. जनगणनेसाठी महापालिकेने पाच हजार प्रगणक नियुक्त करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र कोरोना निर्बंधामुळे स्थगिती मिळाली. प्रगणकाकडून ३१ प्रश्नांच्या आधारे माहिती भरून घेतली जाणार होती. त्यात कुटुंबप्रमुखाचे नाव, घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंब सदस्यांची संख्या, लिंग, विवाहित – अविवाहितांची संख्या, पाण्याची उपलब्धता, शौचालय, ड्रेनेज व्यवस्था, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट जोडणी, एलपीजी जोडणी, वाहनांची संख्या आदींचा समावेश होता.

  चौदावी जनगणना २००१ मध्ये झाली होती. त्यावेळी पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या १० लाख ६ हजार ६२२ होती. २०११ मध्ये पंधरावी जनगणना झाली. त्या वेळी शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६५१ इतकी नोंदविली होती. २००१ ते २०११ दरम्यान महापालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीचा दर सर्वसाधारपणे ७० टक्के इतका होता. लोकसंख्या वाढीचा अपेक्षित दर ग्राह्य धरल्यास पिंपरी – चिंचवड शहराची अपेक्षित लोकसंख्या २९ लाख ३७ हजार ६ इतकी येईल, असे भाकीत आहे.सध्या पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. राज्यातील कोरोना रुग्णही कमी होत आहेत. लवकरच पोटनिवडणुका, धोरणात्मक बाबींसाठी करावयाचे सर्वेक्षण, जनगणना आदी रखडलेल्या कामांवरील स्थगिती उठण्याची शक्यता आहे.

  १) २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या : १०,०६,६२२
  २) २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या : १७,२७,६५१
  ३) २०२१ मधील संभाव्य लोकसंख्या : २९, ३७,००६