शहरात दुचाकी स्वारांचा सुळसुळाट ; गेल्या सहा महिन्यात ६११ वाहने चोरीला

दुचाकींची तोडफोड करणे, पेटवून देण्याच्या काही घटनांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः झोपडपट्टी परिसरात राहत असलेल्या नागरिकांना वाहन तोडफोडीच्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी सुरक्षितता मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    पुणे: शहरातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे. मात्र याचा संधीचा फायदा घेता शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. दिवसाला ६ ते ७ दुचाकींची चोरी होत असल्यामुळे वाहनचोरी विरोधी पथकांच्या डोळ्यावरील झापड उघडणार कधी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मागील सहा दिवसांत ३७ वाहने चोरीला गेली आहेत. तर, सहा महिन्यांत तब्बल ६११ वाहने चोरीला गेल्यामुळे पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    पोलीस दलातील गुन्हे शाखेत दोन वाहनचोरी विरोधी पथके कार्यरत असताना वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे ही पथके नेमके काय काम करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दरवर्षी वाहनचोरीची संख्या मोठी असते. त्यातही दुचाकीचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहनचोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दोन स्वतंत्र वाहनचोरीविरोधी पथके तयार केली होती. मात्र, शहरात वाहनचोरीचे गुन्हे थांबलेले नाहीत. संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातील वाहनचोरीच्या घटना कमी झाल्या होत्या; पण निर्बंध कमी झाल्यानंतर पुन्हा वाहनचोरीचे प्रकार वाढले आहेत.

    घराजवळ आणि कार्यालयानजीक वाहने पार्किंगला जागा नसल्यामुळे सर्वसामान्यांकडून मोकळ्या जागेत पार्किंग केले जाते. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून चोरी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे.गतवर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाहनचोरीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. यावर्षी आतापर्यंतच्या आकडेवारीवरून वाहनचोरीमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात वाहनचोरीचे वाढते गुन्हे रोखण्यात दोन्ही पथकांना अपयश आले आहे. त्यामुळे संबंधित पथकांना वरिष्ठांकडून कानपिचक्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. पथकांना गेल्या काही महिन्यांत म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे वाहनचोरी रोखणार तरी कशी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

    शहरात नोकरी व्यवसायासह शिक्षणासाठी राज्यभरातून नागरिक पुण्यामध्ये येत आहे. कार्यालये, राहत असलेल्या ठिकाणानजीक वाहनांचे पार्किंग केले जाते. मात्र, सराईत दुचाकीचोर चोरट्यांकडून लक्ष्य करून संबंधितांची वाहने चोरली जात आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिंक मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय दाटवस्तीच्या ठिकाणी रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकींची तोडफोड करणे, पेटवून देण्याच्या काही घटनांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः झोपडपट्टी परिसरात राहत असलेल्या नागरिकांना वाहन तोडफोडीच्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी सुरक्षितता मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या चोऱ्या, तोडफोड, जाळपोळ थांबविण्यासाठी पोलिसांकडून कडक उपाययोजना आवश्यक आहेत.