औंधचौक येथे आढलेले दुर्मिळ अल्बिनो मृदुकाय कासव ; आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद

-अलाईव्हचे वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला व राजेंद्र कांबळे यांचा शोधनिबंध प्रसिद्ध

    पुणे : जुलै २०१९ मधे औंधचौक, पुणे येथे दुर्मिळ अल्बिनो भारतीय मृदुकाय कासव (इंडियन फ्लेप शेल टर्टल) आढळले होते. हे गोड्या पाण्यातले कासव भारतभर नदी आणि तलावात आढळते. हे मिश्राहारी असून पाणवनस्पती, गोगलगाई, कोळंबी आणि मासे याचे अन्न आहे. अल्बिनो कासव संपूर्ण पिवळसर पांढरे असल्यामुळे ओळखणे अवघड असते. अल्बिनो म्हणजे रंगहीन कासव अतिशय दुर्मिळ आहे. जनजागृती, दस्तावेजीकरण, संशोधन अश्या विविध प्रकारे निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्यरत अलाईव्ह संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला आणि सर्पमित्र राजेंद्र कांबळे यांचा शोधनिबंध ‘झु’झ प्रिंट(ZOO’s Print) या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत२१ जून २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

    वन्यजीव अभ्यासक व अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, “हे गोड्या पाण्यातील भारतीय मृदुकाय कासव(इंडियन फ्लेप शेल टर्टल) असून हे ‘अल्बिनो’ म्हणजेच रंगहीन होणे. रंग द्रव्याच्या कमतरतेमुळे सजीवांची त्वचा पांढरी किंवा फिक्कट पिवळसर होते. याला अल्बिनिझम असे म्हणतात. ही रंगहीनता अणुवांशिकता, एखाद्या आजार, जणुकिय बदल तसेच खात असलेल्या अन्नदोषांमुळे सुद्धा येऊ शकते. वन्यजीवांच्या अनेक प्रजाती मधे एखाद रंगहीन जीव क्वचित सापडतो. पांढर्‍या रंगामुळे शत्रूच्या नजरेत त्वरित येत असल्यामुळे कमी आयुष्य जगतात. भारतात संपूर्ण रंगहीन भारतीय मृदुकाय कासवाची प्रथम नोंद सन १९२८ साली नागपूर येथे झाली होती. त्यानंतर हिम्मतनगर, गुजरात; चेन्नई, तामिळनाडू; कोळिकोड, केरळ अश्या मोजक्या ठिकाणी आढळले आहेत. जुलै २०१९ मध्ये औंध, पुणे येथे आढळलेले हे भारतीय मृदुकाय कासव महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ९२ वर्षानंतर आढळले आहे. या विषयी आमचा शोधनिबंध ‘झु’स प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे.”

    या कासवाची खाण्यासाठी बेकायदेशीर शिकार केली जाते. सर्वच कासव जलसृष्टीचक्राचे महत्वाचे घटक आहेत. मृत व आजारी जलचर खाऊन हे पाणी शुद्ध ठेवण्यास कासव मोठी भूमिका बजावतात. यांना वाचवण्याची आवश्यकता आहे. सदर शोधनिबंधात झुलोजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.