पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर काळाची गरज-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पुणे यासारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

    पुणे: पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल , असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पिंपरी येथील टाटा मोटर्स या कंपनीस भेट देवून इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर होते.

    इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी, नवीन तंत्रज्ञानावराधारीत बस निर्मिती बाबत माहिती ठाकरे यांनी घेतली. वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले मुंबई, पुणे यासारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे. लांब व जवळच्या पल्याचे अंतर लक्षात घेवून आसन क्षमतेची व्यवस्था करावी. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.