दिवसाढवळ्या घरातून महिलेचे बेशुद्ध करून अपहरण लुटले; अंगावरील दागिने आणि मोबाईल फोन चोरून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोडले

सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे घरातील लोकांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या सास-यांना बोलावण्यास सांगितले. सासर्‍यांना बोलावण्यास जाण्यासाठी फिर्यादी वळल्या असता आरोपींनी त्यांच्या तोंडाला कपडा लावून त्यांना बेशुद्ध केले.

    पिंपरी: घरातील लोकांची चौकशी करण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका महिलेला बेशुद्ध करून तिचे अपहरण केले. तिच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल फोन चोरून तिला पुण्यातील सिंहगड रोडवर सोडून दिल्याची घटना घडली आहे.  अमृता सनी लालचंदानी (वय २७, रा. साई चौक पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे घरातील लोकांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या सास-यांना बोलावण्यास सांगितले. सासर्‍यांना बोलावण्यास जाण्यासाठी फिर्यादी वळल्या असता आरोपींनी त्यांच्या तोंडाला कपडा लावून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून फ्रेंडशिप गार्डन, सिंहगड रोड, पुणे येथे रस्त्याच्या कडेला सोडून दिले. फिर्यादी यांना जाग आल्यानंतर त्यांना समजले की, त्या सिंहगड रोड पुणे येथे असून त्यांच्या हातातील एक लाख रुपये किमतीच्या सोन्याचा बांगड्या, अंगठ्या आणि पंधरा हजार रुपयांचा मोबाईल फोन आरोपींनी चोरून नेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.