पुरंदर तालुक्यातील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात चोरी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नवसाला पावणारे, जागृत देवस्थान व भाविकांचे श्रध्दास्थान असणारे नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज (Shri Siddheshwar Maharaj Temple) व माता जोगेश्वरी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे.

    माळशिरस : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नवसाला पावणारे, जागृत देवस्थान व भाविकांचे श्रध्दास्थान असणारे नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज (Shri Siddheshwar Maharaj Temple) व माता जोगेश्वरी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे, कुलूप तोडून मंदिरातील चांदीचे त्रिशूल व चांदीचे मखर (महिरप) अंदाजे साडेआठ किलो पर्यंतचा ऐवज चोरून नेले आहे.

    सिद्धेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते. रात्री बारानंतर पुजारी पोपट जगताप मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. पहाटे पाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे घरी जात असताना त्यांना मंदिरातील दरवाजा व कुलूप तोडल्याचे दिसून आले. मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले.

    सप्टेंबर २००९ मध्ये याच मंदिरातील चांदीचे मुखवटे व इतर ऐवज चोरी झाला होता. त्याचा तपास सुध्दा होणे गरजेचे आहे. ही घटना अतिशय गंभीर असून, ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. दोन्ही गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर यांनी केली आहे.