चक्क दोन जर्सी गायींची चोरी ; जनावरांच्या चोरीमुळे आणे-पठारभागातील नागरिक हैराण

पेमदरा (ता.जुन्नर) येथे सोमवार (दि.८) रात्री बेलकर मळ्यातील भाऊ रभाजी बेलकर या शेतकऱ्यांच्या राहात्या घराजवळ गोठ्यात बांधलेल्या दोन जर्सी गाई रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे

  बेल्हे : पेमदरा (ता.जुन्नर) येथे सोमवार (दि.८) रात्री बेलकर मळ्यातील भाऊ रभाजी बेलकर या शेतकऱ्यांच्या राहात्या घराजवळ गोठ्यात बांधलेल्या दोन जर्सी गाई रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. कल्याण-नगर महामार्गालगत घर असल्याने महामार्गापासून जवळच असलेल्या बेलकर यांच्या घरावर पाळत ठेऊन ही चोरी झाली असावी असा अंदाज नागरिकांनी वर्तवला आहे. जवळच रस्त्यालगत असलेल्या एका शेतीच्या बांधाला गाडी लावून गाई गाडीमध्ये भरल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

  -अज्ञात चोरट्यांनी अंधारात चोरल्या दोन गाई
  याविषयीची फिर्याद तुकाराम भाऊ बेलकर (वय ३०)रा.पेमदरा यांनी दिली. यामध्ये बेलकर यांचे जवळपास साठ हजार रुपयाचे नुकसान झाले असून,अशा प्रकारच्या चोऱ्या या भागांमध्ये या आधीही घडल्या आहेत. वाहन चोरी, वाहनातील बॅटरी, टायर चोरी, विहिरीतील पाण्याच्या मोटार अशा चोऱ्या नेहमी घडत असतात.

  -अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा
  आणे(ता.जुन्नर) येथील माऊली किराणा, जैनब मोबाईल शाॅपी, घोडेकर हाॅटेल व ईतर दोन दुकानांची शटर वाकवून काही सामान व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे येथील रहिवासी भयभीत झाले असून या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा,अशी मागणी माजी सरपंच आनंदा बेलकर, रंगनाथ बेलकर, उपसरपंच बाळासाहेब दाते, पिंटू गुगळे, जांभर भोसले व बेलकर कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास गोसावी करत आहेत.