…म्हणून अजित पवारांनी थेट न्यायालयातच जाणार असल्याचे सांगितलं

आपल्या विचाराचे पॅनेल निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा. अवघे सात दिवस प्रचारासाठी मिळाले आहेत.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने मोठा हस्तक्षेप सुरु केला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

    बारामती येथे शनिवारी (दि. १८) बारामती तालुका सहकारी दूध संघांच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,किरण गुजर, संभाजी होळकर, विश्वासराव देवकाते, दूध संघाचे अध्यक्ष संदिप जगताप आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिल्या पाच बँकामध्ये आहे. मात्र, सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा असा केंद्राचा प्रयत्न सुरू आहे.

    यामध्ये वकिलांमार्फत कायदेशीर सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे न्यायालयात कशा पद्धतीने जाता येईल. याबाबत राज्य सरकारची सल्लामसलत सुरू आहे. यावेळी बारामती शहर व तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची तसेच प्रकल्पांची माहिती दिली.

    सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा : उपमुख्यमंत्री

    सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपल्या विचाराचे पॅनेल निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा. अवघे सात दिवस प्रचारासाठी मिळाले आहेत. सोमेश्वरचा ३ हजार ३०० रूपयांचा दर हा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यामध्ये आहे. यापुढे कारखान्याची विस्तारवाढ करायची आहे. त्यामुळे आपल्या विचाराचे पॅनेल निवडून येणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.