डॉ. प्रितीशच्या जीए सॉफ्टवेअर कंपनीकडून घेतलेल्या “त्या” परिक्षा संशयाच्या भोवऱ्यात..!

म्हाडाकडून डॉ. प्रितीश याच्या जीए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीला परिक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यानुसार, उमेदवारांना हॉलतिकीट देणे, प्रश्न पत्रिका पुरविणे व परिक्षा झाल्यानंतर त्याच्या उत्तरपत्रिका घेण्याचे काम देखील त्याच्याकडे होते. तर, निकाल लागल्यानंतर तो प्रसिद्ध करण्याचे काम होते.

    पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) पेपर फोडण्याचा प्रयत्नात अटक केलेल्या जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख याने गेल्या दीड ते दोन वर्षात अनेक परिक्षा घेतल्या असून, त्या सर्व परिक्षा आता संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्याबाबत देखील पुणे पोलीस चौकशी करत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, देशमुख याच्या घराची पुणे पोलीसांनी घर झडती घेतली. त्यात पोलीसांना पेन ड्राईव्ह, टॅब व काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार, त्याची तपासणी केली जात आहे.

    पुणे पोलीसांच्या सायबर सेलने म्हाडा परिक्षेची प्रश्न पत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात असताना डॉ. प्रितीश दिलीपराव देशमुख (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. सिंदखेडराजा, जि, बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.

    म्हाडाकडून डॉ. प्रितीश याच्या जीए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीला परिक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यानुसार, उमेदवारांना हॉलतिकीट देणे, प्रश्न पत्रिका पुरविणे व परिक्षा झाल्यानंतर त्याच्या उत्तरपत्रिका घेण्याचे काम देखील त्याच्याकडे होते. तर, निकाल लागल्यानंतर तो प्रसिद्ध करण्याचे काम होते. दरम्यान, देशमुख याच्या जी.ए सॉफ्टवेअर कंपनीने पोलीस भरतीसह अनेक शासकीय पदांच्या भरतीची प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे त्या सर्व परिक्षा वादात अडकल्या आहेत. पुणे पोलीसांकडून सध्या म्हाडाच्या पेपर फोडण्याच्या प्रयत्नाचा तपास सुरू असला तरी त्याच्याकडे चहुबाजूने चौकशी केली जात आहे. यापुर्वी झालेल्या परिक्षेसंदंर्भात देखील त्याच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

    दरम्यान, देशमुख याच्या घराची मंगळवारी पुणे पोलीसांनी झडती घेतली. त्यात पोलीसांनी पेन ड्राईव्ह तसेच टॅब व काही कागदपत्रे मिळाली आहेत. परंतु, त्यात नेमके काय आहे, हे आताच सांगता येणार नाही, असे पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान, दोन पथके वेगवेगळ्या शहरात रवाना करण्यात आली असून, इतर संशयित आरोपी असून, त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही सांगितले आहे.