राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला धमकावून मागितली चार लाखांची खंडणी ; तीन जणांना पैसे घेताना रंगेहाथ अटक

शेख यांनी खंडणी विरोधी पथका दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाकडे केली होती. त्यानुसार, बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी शेख यांच्याकडून खंडणीचे पैसे घेताना या तिघांना सापळा रचून पकडले.

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावत चार लाख रुपयांची खंडणीची मागणीकरून खंडणीचे पैसे घेताना पुणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथक दोनने तिघांना सापळा रचून रंगेहाथ पकडले.

    दीपक विजय निंबाळकर (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर) आणि अमर अबनावे (वय २९ रा. उरळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जुबेर बाबु शेख (वय ४१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे.

    जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रार यांनी पिसोळी येथील सर्व्हे नं. २८/२ अ/१/२/क्षेत्र ८१ आर व सर्व्हे नं. २८/२/१ क्षेत्र ४५ आर या ठिकाणी मिळकती आहेत. त्या मिळकतीकडे जाणार्‍या रस्त्यावर दिपक निंबाळकरने राडारोडा टाकला होता. तो राडारोडा उचलण्यासाठी तक्रारदार व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले. त्यावेळी हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. तसेच, त्यांना पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले होते. याबाबत शेख यांनी खंडणी विरोधी पथका दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाकडे केली होती. त्यानुसार, बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी शेख यांच्याकडून खंडणीचे पैसे घेताना या तिघांना सापळा रचून पकडले.