धक्कादायक ! नातीला जीवे ठार मारण्याची धमकी देत वृद्ध जोडप्याला लुटले ; इंदापूरात दरोडा

इंदापूर : नातीला जीवे ठार मारण्याची धमकी देत,वृध्द इसमास मारहाण करुन,घरावर दरोडा टाकून ४० हजार रुपयांची रोकड,दागिने व मोबाईल असा १ लाख ७ हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याच्या प्रकार काटी(ता.इंदापूर) येथे रविवारी (दि.२०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला आहे.सहा अनोळखी इसमांविरुध्द आज (दि.२१) इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर : नातीला जीवे ठार मारण्याची धमकी देत,वृध्द इसमास मारहाण करुन,घरावर दरोडा टाकून ४० हजार रुपयांची रोकड,दागिने व मोबाईल असा १ लाख ७ हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याच्या प्रकार काटी(ता.इंदापूर) येथे रविवारी (दि.२०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला आहे.सहा अनोळखी इसमांविरुध्द आज (दि.२१) इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.रत्नमाला सिताराम खरात (वय ६० वर्षे रा.काटी ता.इंंदापूर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी सांगितले की, पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी सिताराम औदुबर खरात व त्यांच्या पत्नी रत्नमाला खरात हे वयोवृध्द जोडपे काटी या गावी रहाते.मिळणा-या निवृत्तीवेतनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.त्यांची नात श्रावणी गोपीनाथ थोरात (वय १५ वर्षे) ही अधूनमधून त्यांच्या घरी येत असते.

रविवारी रात्री दहा वाजता हे तिघे जण जेवण करुन झोपले होते.रात्री एक वाजण्याच्या सुमारास दरवाजा बाहेर जोरात आवाज आल्याने रत्नमाला खरात उठुन दरवाजाजवळ आल्या. त्यावेळी दरवाजाबाहेर,तोंड बांधून उभा असलेल्या काळ्या रंगाच्या कपड्यातील दोन अनोळखी इसमांनी त्यांना आत ढकलून खोलीत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ हातात लोखंडी कोयता घेतलेला एक व लाकडी काठ्या घेतलेल्या दोघे अश्या एकूण चार अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला.कोयता घेतलेल्या इसमाने खरात यांची नात श्रावणीच्या गळयाला कोयता लावला.ओरडलात तर मुलीला जिवे मारीन अशी धमकी देत तुमच्या जवळचे सोन्याचे दागिने, पैसे ताबडतोब काढुन द्या,असे दरडावले.एका इसमाने त्याच्या हातातील काठीने श्रावणीला तर दुस-याने सिताराम खरात यांना मारहाण केली.त्यामुळे घाबरुन गेलेल्या रत्नमाला खरात यांनी आपल्या नातीला व पतीला मारू नका असे म्हणत त्यांच्या जवळचे, घरातील असलेले दागिने,पतीला मिळणा-या पेन्शममधुन शिल्लक रहिलेले ४० हजार रुपये दरोडेखोरांकडे दिले, अश्या आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.४० हजार रुपयांची रोख रक्कम,५६ हजार २०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने,१० हजार ८०० रुपयांचे मोबाईल असा लुटून नेण्यात आलेल्या ऐवजाचा तपशील आहे.