सरकारी रेशन काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना अटक

तिघांकडून ३७ हजार ४०० रुपये किमतीचे ३४गव्हाचे पोते,६७ हजारांच्या दोन दुचाकी, असा एकूण एक लाख चार हजार४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेशन दुकानदार थोरात आणि जांभळे यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    पिंपरी: सरकारी रेशन दुकानातील माल चढ्या दराने काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. त्यांच्यासह दोन रेशन दुकानदारांवर जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चंदन द्वारका गुप्ता (वय ३८), रितीक चंदन गुप्ता (वय १८, दोन्ही रा. रहाटणी, काळेवाडी, वाकड, पुणे), शंकर आयोध्या गुप्ता (वय २२, रा. साईनगर, कॉलनी क्रमांक चार, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रेशन दुकानदार थोरात (पुर्ण नाव माहित नाही, वय ४०, रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड, पुणे), जांभळे (पूर्ण नाव माहित नाही, वय ३०, रा. आनंदनगर, झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सामाजिक सुरक्षा विभागाच्या विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती मिळाली की, काळेवाडी येथून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे.त्यानुसार पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला. त्यात दोन दुचाकी (एमएच १४ / ई एल ६५३८ आणि एमएच १४ / जी एल १५४७) वाहने पोलिसांनी जप्त केली. तसेच तिघांना ताब्यात घेतले.

    तिघांकडून ३७ हजार ४०० रुपये किमतीचे ३४गव्हाचे पोते,६७ हजारांच्या दोन दुचाकी, असा एकूण एक लाख चार हजार४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेशन दुकानदार थोरात आणि जांभळे यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुळे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे सोनाली माने यांनी केली आहे.