इंदापूरच्या शेतकऱ्यांची तीन कोटींची फसवणूक; शेतकरी हवालदिल

  निमसाखर : शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पती करार पद्धतीने उत्पादित करण्यासाठी स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून  करार करण्यात आले. मात्र, या करारापोटी  उत्पादित झालेला कच्चामाल घेऊन संबंधित हर्बल कंपनीने  इंदापूर तालुक्यातील दहा ते बारा शेतकऱ्यांची  सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निमसाखर (ता. इंदापूर) येथे उघडकीस आला आहे.

  इंदापूर तालुक्यात आयुष मंत्रालयाचे नाव सांगत एका हर्बल कंपनीचे नाव सांगत मे २०१८ मध्ये काही कंपनीचे काही अधिकारी इंदापुरात आले. त्यांनी शतावरी, अश्वगंधा यासह अन्यऔषधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांपुढे योजना मांडली. सुरुवातीला शतावरी, अश्वगंधा व चिंच ही रोपे विकत घेण्यासाठी एका एकराला पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेण्यात आले.

  यापैकी शतावरी या वनौषधी वनस्पतीला आयुर्वेदासाठी फार महत्त्व असते. याचा वापर औषधासाठी अतिशय गुणकारक असल्याचे यावेळी संबंधितांनी महत्त्व पटवून देण्यात आले. यानंतर या शेतकऱ्यांनी करार पद्धतीवर या वनौषधी लागवडीला  सुरुवात झाली. यात एक एकर अश्वगंधासाठी ६ टनाच्यावर प्रति किलोला ५० रुपये  दर तर सहा टनाच्याखाली तीन लाख रुपये देण्याचे करारात ठरले. शिवाय शेतकऱ्याच्या बांधावर या वनौषधीची खरेदी केली जाणार असल्याचे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले.

  तालुक्यात ५० ते ६० एकरवर वनौषधीची लागवड

  इंदापूर तालुक्यातील १५ ते २० शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर क्षेत्रामध्ये या वनौषधी वनस्पतीची लागवड केली आहे. यामध्ये सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये इतकी फसवणूक झाल्याचे इंदापूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने  सांगितले. नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना हा शेतकरी म्हणाला, पुण्याच्या हर्बल  कंपनीने सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या  बांधावरून  वनऔषधी घेतल्या.  मात्र नंतरच्या काळात शेतकऱ्यांनाच हा माल धुऊन सुकून कंपनीकडे पोहोच करावा लागला.

  पैशासाठी कंपनीकडे वेळोवेळी मागणी केली असता कंपनीकडून  वेगवेगळी कारणे  शेतकऱ्यांना सांगण्यात आली. संबंधित कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला या भागातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

  कंपनीकडून १६ लाख २२ हजार येणे बाकी

  एक एकर शतावरी लागवड करण्यासाठी कंपनीसोबत करार केला.  डिसेंबर २०१९ला या शतावरीचे  कंपनीकडून १६ लाख २२ हजार येणे बाकी आहे. मात्र यातील काहीच रक्कम मिळाली नसल्याचे आणि वेळोवेळी याचा पाठपुरावा करत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

  कर्ज मंजुरीचे बनावट पत्र

  संबंधित हर्बल  कंपनीकडे आपल्या पैशासाठी तालुक्यातील शेतकय्रांनी सतत मागणी करत होते. दरम्यान कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी  बँकेचे कर्ज  मंजूर झाले असल्याचे  बनावट पत्र  संबंधित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. मात्र  शेतकऱ्यांना त्या पत्राविषयी शंका निर्माण झाल्याने शंकानिरसन करण्यासाठी  बँकेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी धाव घातली. त्यावेळी हे पत्र बनावट असल्याचे उघड झाले.  त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.