घरफोड्या करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील तिघांना पोलीसांकडून फिल्मी स्टाईलने अटक

शहरात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या तसेच जबरदस्तीने लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या घटनांना ब्रेक लावण्यासोबतच त्या उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान, युनिट सहाचे पथक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनाप्रमाणे हद्दीत गस्त घालत होते.

    पुणे :  शहरातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील तिघांना पोलीसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून अटक केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल २० तोळे सोने, १४ किलो चांदी यासह १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, ८ गुन्ह्यांची उकल केली आहे.

    सचिन उर्फ राहुल राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय २८, रा. हडपसर, मुळ. पंढरपुर), सांरग उर्फ सागर संजय टोळ (वय २५) व सनि महेशकुमार तनेजा (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर, त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत.

    शहरात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या तसेच जबरदस्तीने लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या घटनांना ब्रेक लावण्यासोबतच त्या उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान, युनिट सहाचे पथक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनाप्रमाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खुर्द फाटादरम्यान सचिन माने हा त्याच्या साथीदारांसह वाहनांना अडवून त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलीसांनी या परिसरात सापळा रचला. आरोपी दिसताच त्यांना पकडण्यात आले. परंतु, पाच जणांच्या टोळीतील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या तिघांना पोलीसांनी पकडले. त्यांना ताब्यात घेऊन कार तसेच दरोड्याचे साहित्य असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली व पोलीस कोठडीत त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यावळी त्यांच्याकडून शहरातील विविध भागात केलेल्या ८ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून एकूण २० तोळे सोने, १४ किलो चांदी व रोकड असा १८ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, रमेश मेमाणे, मच्छिंद्र वाळके व त्यांच्या पथकाने केली आहे.