चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता व्हावं लागतं : ॲड. नीलिमा गुजर

मोबाईलच्या दुष्परिणामापेक्षा मोबाईलचा सकारात्मक लाभ आपण घ्यायला हवा. जिथं स्पर्धा तिथं तर हार जीत असणार, हार झाल्याने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता व्हावं लागतं, असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर यांनी केले. त्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्‍तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे, उपप्राचार्य डॉ.शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, प्रा. अंकुश खोत, डॉ. उत्कर्षा ठाकरे, आक्यूएसी समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, प्रा. सुनील डिसले, प्रा. नंदकुमार खळदकर, प्रा. शिवाजी टकले याप्रसंगी उपस्थित होते.

  यावेळी गुजर म्हणाल्या, “विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने सुरू केलेली ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गेली २० वर्षे अखंडितपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील वक्तृत्वाची कला अखंडित सुरू राहून, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आमच्या या स्पर्धेचं नाव नेहमीच अग्रेसर असते. एक चांगला वक्ता होण्यासाठी आधी एक चांगला श्रोता व्हावं लागतं. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करायला हवं. मोबाईलच्या दुष्परिणामापेक्षा मोबाईलचा सकारात्मक लाभ आपण घ्यायला हवा. जिथं स्पर्धा तिथं तर हार जीत असणार, हार झाल्याने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी आमच्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे ही स्पर्धा अविरतपणे चालू राहिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण गुगल मीटद्वारे या स्पर्धेचा आनंद घेऊ शकलो. सर्वांनाच याचा फायदा झाला.

  महाविद्यालयाचा मराठी विभाग या स्पर्धेचं परिश्रमपूर्वक संयोजन करत असल्याने ही स्पर्धा गेली २० वर्षे अविरतपणे सुरू आहे अणि ती अशीच अखंडितपणे सुरू राहावी यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पुढीलवर्षी स्पर्धा ऑफलाइन होऊ देत आणि आपल्याला सर्वांना कोरोनापूर्वीच्या दिवसांचा आनंद मिळू दे. मी नक्की पुढच्या वर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहून वक्तृत्वपटूंच्या वैचारिक मेजवानीचा आनंद घेईन, असे त्या म्हणाल्या.

  पद्मविभूषण शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी १२ व १३ डिसेंबर रोजी प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या स्पर्धेचे हे २० वे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील विविध महाविद्यालयातील ७० स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.

  १२ व १३ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच्या माध्यमातून संस्थेच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना वरिष्ठ विभागासाठी 11,000, 7,000, 3,000 व 1,000 तसेच कनिष्ठ विभागासाठी 10,000, 5,000, 2,000 व 1,000 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  कनिष्ठ विभागाचा अक्षय चौरे (प्रथम क्रमांक), वरिष्ठ विभागाची साक्षी बुढ्ढे (द्वितीय क्रमांक)यांनी उपस्थित राहून पारितोषिक स्वीकारले. कनिष्ठ विभागाचा प्रतिभा करंडक शारदाबाई पवार महाविद्यालयाच्या स्नेहा दत्तात्रय शिंदे व वैष्णवी प्रशांत चव्हाण यांनी स्वीकारला.

  स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नंदकुमार खळदकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.