बारामतीत कामगार संघटनांचा सोमवारी संप

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कामगार कायद्यात केलेले बदल कामगार विरोधी असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला असून, या कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि.२७) कामगार संघटनांनी संप पुकारला असून, या संपात पुणे जिल्हा संयुक्त कामगार कृती संघटना सहभागी होणार आहे.

    कायद्यात कामगार विरोधी बदल केल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. केंद्रातील सत्तारुढ असणा-या भाजप सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी बदल केले आहेत. कामगारांची सेवा सरक्षा वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे.

    याबाबत ग्रीव्हीज कॉटन अ‍ॅण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियन पियाजो युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा व बँकासारख्या मुलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपकम देखील विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. कोरोना काळात कोट्यावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना तात्काळ साह्य देण्याची गरज आहे. त्याचवेळी शेतक-यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदे देखील केलेले आहेत. या सर्वाच्या विरोधात तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटीत, असंघटीत, कंत्राटी, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

    आयटक सहभागी असलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संपामध्ये सहभागी आहे. म्हणून आपल्या कंपनीतील सर्व कामगार बंधू-भगिनी आयटकच्या मार्गदर्शनाखाली या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.या पार्श्वभुमीवर केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटीत, असंघटीत, कंत्राटी, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटना २७ सप्टेंबर रोजी होणाºया संपात सहभागी होणार आहेत.

    तसेच सरकारी नियमानुसार कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (दि २७) संबंधितांनी कोणीही कामावर न येता आपल्या न्याय मागण्यांसाठी या संपामध्ये सहभागी व्हावे. तसेच सकाळी ठीक १०.३0 वा. तहसीलदार कार्यालय (प्रशासकीय भवन) बारामती येथे निवेदन देण्यासाठी सर्व कामगार बंधू-भगिनींनी उपस्थित राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.